नागरिकांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने मेट्रोच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल
![Wooden bridge closed for Metro work every night till September 12](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/pune-6.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
मेट्रो स्टेशनचे काम करताना हलगर्जीपणा केल्याने लाकडाचे तुकडे रस्त्यावर पडले. त्यात एक दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी नऊ वाजता नाशिक फाटा मेट्रो स्टेशन येथे घडली. याप्रकरणी मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणा-या संबंधित कंत्राटदाराच्या जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल फकिरा कदम (वय 40, रा. शिरगाव, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरु आहे. नाशिक फाटा येथे नाशिक फाटा मेट्रो स्टेशनचे काम सुरु आहे. हे काम मेट्रोने एका कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदाराच्या संबंधित कामगारांनी रस्त्याने जाणा-या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे लाकडाचा एक तुकडा रस्त्यावर पडला.
दरम्यान, फिर्यादी अमोल कदम आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून रस्त्याने जात होते. मेट्रो स्टेशनच्या कामावरून पडलेला लाकडाचा तुकडा अमोल यांच्या डोक्यात पडला. सुदैवाने अमोल यांनी हेल्मेट घातले असल्याने त्यांना गंभीर इजा झाली नाही. ते किरकोळ जखमी झाले. मात्र सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याबाबत मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणा-या कंत्राटदाराच्या संबंधित जबाबदार व्यक्तींवर भारतीय दंड विधान कलम 337 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे तपास करीत आहेत.