बनावट वेबसाईटद्वारे तरुणाची पंधरा लाखांची फसवणूक; एका चिनी व्यक्तीसह चार जणांवर गुन्हा दाखल
![ Fifteen lakh fraud of youth through fake website; Four people, including a Chinese man, have been charged](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Online-fraud.jpg)
पिंपरी चिंचवड | आर्थिक गुंतवणूक केल्यास 90 दिवसात जास्त रेफरल बोनस मिळण्याचे आमिष दाखवून चार जणांनी मिळून तरूणाची 15 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 16 डिसेंबर 2020 पासून 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत काळेवाडी येथे घडला.संतोष बाळू गराडे (वय 30, रा. विजयनगर काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदय प्रताप, राजेश शर्मा (दोघे रा. गुडगाव), निलेश कुमार कोठारी (रा. द्वारका) आणि एका चिनी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून व्हाट्सअपद्वारे संपर्क करून ई बाईक सायकलच्या सहा योजनांमध्ये दहा हजार रुपये भरल्यास 90 दिवसात पाच लाख 85 हजार रुपये मिळतील असे जास्त रेफरल बोनसचे आमिष दाखवले. आरोपींनी संगणक साधनसामग्रीचा वापर करून खोटी वेबसाईट तयार केली. ती खरी असल्याचे भासवून त्याद्वारे फिर्यादी यांना रक्कम भरण्यास प्रवृत्त केले. आरोपींनी रेझरपे या पेमेंट गेटवेचा वापर करून नेट बँकिंग, फोन पे, गुगल पे द्वारे फिर्यादी
यांना 14 लाख 96 हजार 588 रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. 90 दिवसात बोनससह रक्कम परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.