breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तुकोबांच्या पालखीला उद्योगनगरीतून निरोप

पिंपरी : पहाटेचे आल्हाददायक वातावरण, पावसाची रिमझिम, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनाम घेत उत्साहात पावले टाकणारे वारकरी, पालखीच्या दर्शनासाठी रस्त्यावर लोटलेला जनसागर, सकाळच्या कोवळ्या उन्हात उजळून निघालेला तुकोबांच्या पालखीचा चांदीचा रथ आणि ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर, अशा भावपूर्ण वातावरणात रविवारी (ता. ३०) जगद्‍गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीला पिंपरी-चिंचवडकरांनी निरोप दिला.

शनिवारी (ता. २९) आकुर्डीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुक्कामी असलेली संत तुकारामांची पालखी रविवारी पहाटे पाच वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली. त्यापूर्वी पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत तुकारामांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर काकड आरती झाली.

यावेळी प्रभाग अधिकारी सुचेता पानसरे, उपायुक्त निलेश बधाने, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, प्रमोद निकम, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. त्यानंतर सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. उपस्थित अधिकाऱ्यांनीही पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी खंडोबा मंदिर ते महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीपर्यंतचा टप्पा चालत पार केला.

हेही वाचा –  पिंपरी विधानसभेसाठी भाजपच्या तेजस्विनी कदम तीव्र इच्छुक..!

साडेपाचच्या सुमारास पालखी खंडोबा माळ चौकातून जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आली. पालखीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच शहरवासीयांनी पालखीमार्गाच्या दुतर्फा गर्दी केली होती. सुटीचा दिवस असल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदारवर्ग, तरुण तरुणी यांची संख्या लक्षणीय होती. पारंपारिक वेशभूषा करून महिला व लहान मुल पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

आपल्या मोबाईलमध्ये पालखीचे फोटो टिपण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. कपाळावर गंध रेखाटून मोबाईलमध्ये सेल्फी देखील घेतले जात होते. शनिवारप्रमाणेच रविवारीही पालखी मार्गावर अनेक भाविक व संस्थांनी पाणीवाटप तसेच अन्नदान केले. पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाल्यानंतर काही सामाजिक संस्थांच्या वतीने पालखीमार्गावर स्वच्छता मोहिमही राबविण्यात आली.

सकाळी सव्वा सात वाजता पालखी एचए कॉलनीतील विठ्ठल मंदिरामध्ये विसाव्यासाठी थांबली. याठिकाणीही भाविकांनी रांगा लावून संत तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेतले. पालखीसोबत दिंड्यांतील वारकऱ्यांनी देखील न्याहारीसाठी विसावा घेतला. त्यानंतर पालखी सोहळा कासारवाडीकडे निघाला. साडेअकराच्या सुमारास दापोडी येथे पालखी सोहळा दुपारच्या विश्रांतीसाठी थांबला. त्यानंतर हॅरिस पुलावरून पुण्याच्या हद्दीत पालखीने प्रवेश केला. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी पालखीला निरोप दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button