FACT CHECK : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 12 हजार कोटींची कर्जबाजारी?
महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत खरी वस्तुस्थिती काय आहे?

प्रत्येक स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकराने वाचलीच पाहिजे, अशी बातमी!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मावळते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची नुकतीच बदली झाली. त्यांना 2026 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा आयुक्तपदाची जबाबदारी मिळाली. पण, IAS अधिकारी शेखर सिंह यांच्या 3 वर्षांच्या काळात महापालिका कर्जबाजारी झाली..?… आर्थिक घडी विस्कळीत झाली… किंबहुना, महापालिका लुटून खाल्ली… असे आरोप झाले.
शहरातील काही प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियामध्ये चर्चा झाली. याउलट, शहरात दोन ठिकाणी शेखर सिंह यांचा नागरी सन्मानही झाला. त्यामुळे शेखर सिंहांच्या कारकीर्दीत महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारली की बिघडली.. याबाबत संभ्रम निर्माण झाला. याबाबत ‘‘दूध का दूध आणि पाणी का पाणी ’’ करण्याबाबत ‘‘महाईन्यूज’’ च्या माध्यमातून या मुद्यावर ‘FACT CHECK’ करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने IAS अधिकारी शेखर सिंह यांचा दोन ठिकाणी भव्य नागरी सन्मान करण्यात आला. एक चिंचवडमध्ये आणि दुसरा भोसरीमध्ये. पण, आयुक्तांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले. तसे शहरात आयुक्तांच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये ‘‘महापालिकेवर तब्बल 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे…’’ असा धक्कादायक दावा करण्यात आला.
यावर, नागरी सन्मान सोहळ्यातील मुलाखतीच्या कार्यक्रमात याबाबत IAS अधिकारी शेखर सिंह यांनी खंतही व्यक्त केली. शहरातील विकासकामे आणि प्रकल्पांबाबत मतभिन्नता असणे, स्वाभाविक आहे. पण, राजकीय उद्देशाने ‘फेक नॅरेटिव्ह’ केला जातो, ही बाब शहराच्या हिताची नाही, अशी चिंताही व्यक्त केली.
एखादा IAS दर्जाचा अधिकारी ‘फेक नॅरेटिव्ह’ बाबत चिंता व्यक्त करतो. ही बाब चिंतन करायला लावणारी आहे. सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत खरी वस्तुस्थिती ज्ञात होणे अपेक्षीत आहे.
शहरातील कथित ज्येष्ठ पत्रपंडितांनीसुद्धा महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत आणि आयुक्त शेखर सिंहांच्या कार्यपद्धतीबाबत अक्षरश: आसूड ओढले. विकासकामांवरुन, धोरणात्मक निर्णयावरुन झालेली टीपण्णी रास्त असू शकते, पण आकडे खोटं बोलत नाहीत, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण, महापालिका लेखा विभागाकडून मिळालेली माहिती डोळ्यांत अंजन घालणारी आहे. ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी असे निराधार व्यक्त होणे, शहराच्या हिताचे नाही, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
हेही वाचा – रोहित-विराटची धडाकेबाज भागीदारी; भारताचा ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने दणदणीत विजय
महापालिकेची आर्थिक स्थिती कशी आहे?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला क्रीसील व केअर या क्रेडीट रेटींग संस्थेने AA+ Stable क्रेडीट रेटींग पत मानांकन दिले आहे. जे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे ध्योतक आहे. तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 10 कलम 109 व 110 नुसार महापालिकेस शासनाच्या पूर्व मंजुरीने कर्ज घेण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार महापालिकेने चिंचवडमधील एम्पायर इस्टेट फ्लायओव्हर ब्रिजसाठी 30 वर्षांच्या मुदतीने 159.91 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी 91.90 कोटी रुपयांची परतफेड केली आहे. मुळा नदी सुधार प्रकल्प 4 वर्षांच्या मुदतीसाठी 200 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी 90 कोटी रुपयांची परतफेड केली आहे. भोसरीमधील हरीत सेतू आणि टेल्को रोड प्रकल्पासाठी 5 वर्षांच्या कालावधीकरिता 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्यात आले. त्यापैकी 13.50 कोटी रुपयांची परतफेड केली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, आतापर्यंत महानगरपालिका प्रशासनाने एकूण 559.91 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी 195.40 कोटी रुपयांची परफेड केली आहे. म्हणून महापालिकेवर 364.51 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मग, 12 हजार कोटी रुपयांनी महापालिका कर्जबाजारी झाली, हा दावा म्हणून पिंपरी-चिंचवडकरांच्या डोळ्यांत निव्वळ धुळफेक आहे.
IAS शेखर सिंह यांच्या काळात आर्थिक घसरण?
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून IAS अधिकारी शेखर सिंह यांनी ऑगस्ट- 2022 मध्ये पदभार स्वीकारला. 3 वर्ष 2 महिन्यांच्या कार्यकाळामध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली, असा दावा केला जातो. पण, खरी वस्तुस्थिती वेगळी आहे, जी पिंपरी-चिंचवडकरांनी लक्षात घेतली पाहिजे. महापालिकेचे मागील तीन वर्षांचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे.
1. सन 2022-23 : 3 हजार 900 कोटी
2. सन 2023-24 : 4 हजार 366 कोटी
3. सन 2024-25 : 4 हजार 486 कोटी
आकडेवारी पाहिली असता 3 वर्षांमध्ये महापालिकेच्या उत्पनामध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झालेली दिसते. त्यामुळे आर्थिक स्थिती घसरली, असा दावा पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे. कारण, महापालिका प्रशासनाने सुमारे 6 हजार कोटींच्या मुदत ठेवी (FD) केल्या आहेत. दि. 1 एप्रिल 2025 ते आजपर्यंत : 1 हजार 914 कोटी आहेत, असे लेखा विभागाकडून समजले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक स्थिती घसरली किंवा 12 हजार कोटींचे कर्ज आहे, असा दावा निव्वळ ‘‘फेक नॅरेटिव्ह’’ चा प्रकार आहे. महापालिकेने 559 कोटींचे कर्ज प्रकल्पांसाठी घेतले होते. त्यापैकी 195 कोटी रुपयांची परतफेड झाली असून, 350 कोटींचे कर्ज शिल्लक आहे. दुसरीकडे, 6 हजाराहून अधिक कोटी रुपयांच्या ठेवी (FD) आहेत. त्यामुळे सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांनी ‘‘फेक नॅरेटिव्ह’’ ला बळी न पडता आपले शहर आणि महानगरपालिका प्रशासन याबाबत स्वाभिमान बाळगला पाहिजे. चुकीच्या गोष्टींना विरोध करुच, पण राजकीय उद्देशाने शहराची बदनामी होणार नाही… याची काळजी घेतली पाहिजे.




