ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दुःखद प्रसंगीही जपली सामाजिक बांधिलकी..!

धीरज चुत्तर यांच्या अवयवदानातून सहा जणांना नवे जीवन

पिंपरी चिंचवड | भोसरीतील आळंदी रोड परिसरात अनेक वर्षांपासून आदिनाथ प्रोव्हिजन स्टोअर्स नावाने किराणा व्यवसाय करणारे प्रतिष्ठित व्यापारी धीरज सुभाष चुत्तर (वय 38) यांचे ब्रेन डेड झाल्याने दुःखद निधन झाले. मात्र, मृत्यूनंतरही चुत्तर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत धीरज यांचे अवयवदान करून एका सहा वर्षांच्या लहान मुलासह एकूण सहा गरजू रुग्णांना जीवनदान दिले आहे. या निर्णयामुळे दुःखाच्या क्षणीही मानवतेचा दीप उजळून निघाला आहे.

अत्यंत मनमिळावू, हसतमुख स्वभावाचे धीरज चुत्तर व त्यांचे कुटुंब भोसरी परिसरात सहृदयी कुटुंब म्हणून ओळखले जाते. मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी चक्कर येऊन पडल्याने धीरज यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपासण्या व सुयोग्य उपचारासाठी त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मेंदूच्या गंभीर दुखापतीमुळे सर्वतोपरी उपचार करूनही शनिवारी, दि. ७ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले.

हेही वाचा     :            महाशिवरात्री दिवशी भीमाशंकर मंदिर बंद… ‘हे’ आहे कारण…

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण चुत्तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही, डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि सामाजिक भान जपत कुटुंबीयांनी अवयवदानाचा धाडसी व प्रेरणादायी निर्णय घेतला. धीरज यांच्या मृत्यूपश्चात लिव्हरचा काही भाग, दोन्ही किडन्या आणि दोन्ही नेत्र दान करण्यात आले. यामधील लिव्हरचा काही भाग सहा वर्षांच्या एका लहान मुलासाठी जीवनदायी ठरला, तर उर्वरित अवयवांमुळे आणखी पाच रुग्णांना नवे जीवन मिळणार आहे.

या सामाजिक बांधिलकीबद्दल भोसरी व परिसरातून चुत्तर कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिक त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करत आहेत. या कठीण काळात भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक सागर गवळी यांनी चुत्तर कुटुंबीयांना मोलाचा आधार दिला. तसेच मुख्यमंत्री रुग्ण सहायता विभागाचे विशेष साहाय्य लाभले अशी माहिती चुत्तर कुटीबीयांनी दिली.

ऐन तारुण्यात अचानक मृत्यू ओढवूनही स्व. धीरज चुत्तर यांच्या आठवणी अवयवदानामुळे इतरांच्या जीवनात जिवंत राहतील, अशी भावना व्यक्त केली जात आहे. चुत्तर कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी आदर्श ठरणारा असून, अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी तो प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button