पिंपरी-चिंचवड महापालिकडून ऑक्सिजन व्यवस्थापन समितीची स्थापना
![Establishment of Oxygen Management Committee by Pimpri-Chinchwad Municipal Corporation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/10-3.jpg)
पिंपरी |
गेल्या दोन दिवसापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जम्बो कोविड, अँटो क्लस्टर व इतर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. परंतू, ऑक्सिजन संपला अशी परिस्थिती नव्हती. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या विशेष सहकार्यामुळे मंगळवारी रात्री तीन टँकरद्वारे सुमारे २२ टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेकडून ऑक्सिजन व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे. ऑक्सिजन समन्वयक स्मिता झगडे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या विशेष सहकार्यामुळे काल रात्री तीन टँकर द्वारे सुमारे २२ टन ऑक्सिजन मे.सहानी, मे.आयनॉक्स व मे.एअर लिक्वीड यांच्यामार्फत उपलब्ध करुन घेतला आहे. सद्यस्थितीमध्ये जम्बो कोविड, अँटो क्लस्टर, गवळी माथा व इतर ठिकाणी असलेल्या कोविड सेंटरला आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.तसेच वेळोवेळी असा साठा उपलब्ध व्हावा यासाठी अन्न व औषध प्रशासन सोबत समन्वय ठेवून ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन घेण्याचे काम अविरत चालू आहे.
खासगी रुग्णालयांना देखील ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर उपलब्ध करुन दिलेले आहेत. ऑक्सिजन नाही म्हणून मंगळवारी रात्री कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही. सद्यस्थितीमध्ये कोविड 19 अंतर्गत ऑक्सिजन व्यवस्थापन समिती (Oxygen Monitoring Team) स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, प्रमोद ओंभासे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. उपअभियंता मोहन खोंदरे, कनिष्ठ अभियंता संदीप पाडवी, अमोल धडस, दिग्विजय पवार, संभाजी गायकवाड, चंद्रकांत गुंडाळ, प्रवीण धुमाळ यांनी समन्वय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करावयाचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, अन्य शासकीय कार्यालय, पुरवठाधारक यांच्या संपर्कात राहून कामकाज करण्यासाठी उपअभियंता दीपक करपे, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे यांची नियुक्ती केली आहे.
वाचा- देवदूत! पुण्यात करोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत मोफत रिक्षा प्रवास; तरुणांचा कौतुकास्पद उपक्रम