breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणी नदी वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने एल्गार आंदोलन 

आळंदीतील इंद्रायणी नदीकाठी सकाळी 11 वाजता होणार आंदोलन 

शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांची माहिती 

पिंपरी | लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्‍थान असलेली इंद्रायणी नदी ऐन आषाढी वारीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली दिसून आली. नदीत विविध कारखान्‍यांचे पाणी सोडल्‍याने नदीवर मोठ्या प्रमाणात फेस आला आहे. या फेसाचा पूर्ण तवंग नदीच्‍या सर्व पात्रात पसरला आहे आणि पाण्‍याला दुर्गंधी येत आहे. या नदीचे पाणी पवित्र समजले जाते आणि त्‍यात वारकरी स्नान करतात. हे पाणी सध्‍या इतके प्रदूषित आहे की,  वारकर्‍यांनी स्नान केल्यानंतर त्यांना त्वचा विकारही झाल्याचे दिसून आले. गेले अनेक दिवस याबाबत तक्रारी करून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली दिसून आलेली नाही. त्यामुळे  गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे.  आळंदीतील इंद्रायणी नदीकाठी हे आंदोलन सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी दिली.

याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की  लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्‍थान असलेली इंद्रायणी नदी   प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आहे. नदीत विविध कारखान्‍यांचे पाणी सोडले जात आहे.  पाणी अस्‍वच्‍छ असून ठिकठिकाणी घाण साचलेली आहे आणि जलपर्णीची समस्‍याही अजून मोठ्या प्रमाणात आहे.  नदीकाठावर असलेल्या  ‘केमिकल आस्‍थापना ’ प्रक्रिया न करता त्‍यांचे रसायनमिश्रीत पाणी थेट नदीत सोडतात. यामुळे नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. रसायनयुक्‍त पाणी नदीत सोडल्‍याने नदीच्‍या पाण्‍याचा रंग कधी हिरवा, तर कधी पिवळा होतो, तसेच पाण्‍यातील प्राणवायू अल्‍प होत चालला आहे. यामुळे नदीतील मासे आणि अन्‍य जलचरांचे अस्‍तित्‍वही धोक्‍यात आले आहे.

हेही वाचा    –        Good News । सोसायटीधारकांच्या हक्कांसाठी ‘महारेरा’त होणार सुधारणा! 

याच समवेत काही भंगार व्‍यावसायिक त्‍यांच्‍या भंगारातील टाकाऊ कचरा थेट नदीत टाकतात. यात प्‍लास्‍टिकचा समावेशही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळेही नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. पिंपरी चिंचवडमधील सत्ताधाऱ्यांनी या इंद्रायणी नदीच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.  कोट्यावधीचे टेंडर काढून नदीच्या नावाखाली स्वतःचा खिसा भरला .  नमामि इंद्रायणी प्रकल्प, रिव्हर सायक्लोथॉन, जलपर्णी काढणे ही त्यापैकी काही उदाहरणे आहेत.

गेली दहा वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये  नदी सुधार प्रकल्प कागदावर आहे.  नदी परिसरात राडारोडा टाकणे बंद झाले नाही.  एसटीपी प्लांट देखील पूर्णत्वाला गेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते  आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन दिले  मात्र  स्वतःचे बॅण्डिंग दुसऱ्याच्या पैशांमधून करण्याशिवाय मुख्यमंत्री ते येथील पर्यावरणाचा कळवळा असणारे भाजपचे स्थानिक आमदार यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी काय केले ते सांगावे, असेही पत्रात म्हटले आहे.
इंद्रायणी नदीचे झालेले वाटोळे आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामध्ये सत्ताधारी भाजपचा नाकर्तेपणा, भ्रष्टाचारीपणा कारणीभूत आहे.  हा त्यांचा खरा चेहरा नागरिकांसमोर आणण्यासाठीच महाविकास आघाडीच्या वतीने एल्गार आंदोलन आळंदी येथे होत असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यामध्ये  महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button