विषय समिती सभापतींची निवडणूक होणार बिनविरोध; राष्ट्रवादीने भरले नाहीत अर्ज
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाच विषय समिती सभापतीपदासाठी केवळ सत्ताधारी भाजप उमेदवारांचे अर्ज आले आहेत. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे सभापतींची निवडणूक बिनविरोध होणार आहे. गुरुवारी (दि.18) त्यांच्या निवडीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.सभापतीपदासाठी आज (शुक्रवारी) दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. या वेळेत केवळ सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरले. भाजपने दोघांना पुन्हा संधी दिली आहे. विधी समितीसाठी स्वीनल म्हेत्रे, महिला व बालकल्याण समितीसाठी सविता खुळे, शहर सुधारणा समितीसाठी अनुराधा गोरखे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीसाठी प्रा. उत्तम केंदळे आणि शिक्षण समितीसाठी माधवी राजापुरे यांचे अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादीने अर्ज भरले नसल्याने भाजप उमेदवारांची बिनविरोध निवड होणार आहे.
महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. त्यात बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्बत होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार कामकाज पाहणार आहेत.