तुषार सहाणे यांना निवडून द्या, तुमच्या प्रश्नांना सोडविण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार
मिशन-PCMC: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विजयी निर्धार सभा उत्साहात

पिंपरी चिंचवड | कोणत्याही दबावाला न घाबरता, दडपशाही झुगारून प्रभाग आठ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार सहाणे यांना निवडून द्या. तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी माझी राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक आठ मधील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार तुषार सहाणे यांच्यासाठी मतदानाचे आवाहन प्रभागातील नागरिकांना केले.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये परिवर्तनाचा संदेश देणारी विजयी निर्धार सभा उत्साहात पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जाहीर सभा झाली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी लढा उभारण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला.
ही सभा केवळ निवडणुकीची औपचारिक घोषणा नसून प्रभागाच्या परिवर्तनासाठीचा बुलंद आवाज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विकासाला गती देण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
हेही वाचा : भाजप म्हणजे सर्वसमावेशक विकास – भाजप उमेदवारांचा निर्धार
यावेळी तुषार सहाणे यांनी प्रभागाच्या विकासासाठी अष्टप्रधान संकल्पना मांडली. पाणी, पायाभूत सुविधा, स्वच्छता, रोजगार, सुरक्षा, सक्षमीकरण, आरोग्य आणि शिक्षण या आठ मुद्द्यांवर आधारित विकास आराखडा राबविण्याची ग्वाही त्यांनी दिली. शुद्ध आणि समान पाणीपुरवठा, खड्डेमुक्त रस्ते, अद्ययावत उद्याने, सुसज्ज पार्किंग व्यवस्था, स्वच्छ व हरित प्रभाग निर्मिती यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
युवकांसाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांची सुरक्षितता अधिक मजबूत करणे आणि महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणे ही प्राधान्ये असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला. अजित पवार यांच्या शब्दावर विकासाची खात्री असल्याचे सांगत नळाद्वारे दररोज पाणीपुरवठा, ट्रॅफिक समस्यांवर उपाय, नियमित स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त परिसर, तसेच हायटेक आरोग्य सुविधांची उपलब्धता या मुद्द्यांची पुनरुच्चार करण्यात आला. जनतेच्या विश्वासाच्या जोरावर प्रभाग क्रमांक आठमध्ये निश्चितच विजयाचा नवा इतिहास घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




