धर्माबरोबर शिक्षणाचा प्रचार करणे आवश्यक : डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
![Education must be promoted along with religion: Dr. Chandrasekhar Shivacharya Mahaswamiji](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/WhatsApp-Image-2022-05-24-at-2.59.59-PM.jpeg)
पुणे | प्रतिनिधी
धर्माबरोबरच शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार गरजेचा आहे. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. आज देशात धर्मावरून राजकारण सुरु आहे हे कुठेतरी थांबायला हवे. यापेक्षा हि महत्वाचे म्हणजे समाजाचा कसा विकास होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
एरंडवणे येथील कलमाडी हायस्कूल येथे जंगमवाडीमठ श्री जगद्गुरु विश्वाराध्य विदयार्थी निलय, पुणे आणि डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामिजी यांच्या अमृतमोत्सवानिमित्त आजी – माजी निलय विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते अध्यक्षस्थानी बोलत होते.
यावेळी डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य, प्रथम कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापिठाचे डॉ. इरेश स्वामी, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस नागपूरचे गजानन राजमाने, द विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन अनिल गाडवे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी, रेणूक शिवाचार्य महाराज, प्रबंधक काशी जंगमवाडी मठाचे नलिनी चिरमे, सचिन चिरमे, जंगमवाडी मठाचे व्यवस्थापक सुधाकर हलगणे, भरत उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रख्यात गणित तज्ञ प्रा. डॉ. बसवराज मुडगी म्हणाले, सर्वांच्या आयुष्यात गुरू असणे आवश्यक आहे कारण गुरुमुळे आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते तसेच समाजात चांगला व्यक्ती म्हणून काम करता येते. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी अंतःकरणापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे. यशाच्या पाठीमागे न धावता आपले काम प्रमाणिक करत रहा यश आपोआप मिळेल.
प्रथम कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापिठाचे डॉ. इरेश स्वामी म्हणाले, शिवाचार्य यांनी धर्माच्या प्रचारासोबत सामाजिक काम करत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात निवाऱ्याची व्यवस्था केली. त्यामुळे अनेकांना शिक्षण घेता आले. पिठाची शोभा न वाढवता त्यांनी त्यांनी अनेक सामाजिक काम केले त्यात मराठवाड्यातील दुर्लक्षित ग्रंथाचे प्रकाशन केले.
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस नागपूरचे गजानन राजमाने म्हणाले, निलयमध्ये राहिल्यामुळे चांगले संस्कार आणि शिस्त लागली. यामुळे सरकारी नोकरी करत असताना २१ नक्षल अटक केले, ५ नक्षल सरेंडर केले. ज्या गावात निवडणूक होत नव्हते तिथे निवडणूक घेतली. नागपूरची संघटित गुन्हेगारी संपून टाकली आहे. सरकारी नोकरी करताना कधीही भाष्टाचार केला नाही.
डॉ. चन्नसिद्धराम पंडितराध्य शिवाचार्य म्हणाले, दान हा खूप मोठा गुण आहे व्यक्तिलाही मोठा बनवतो. आपण विविध दान पाहिले आहेत यात अन्न दान, विद्या दान, आर्थिक दान, कन्या दान आहेत परंतु विद्या दान हे आजीवन आनंद देत राहतो. आपण काम करत असताना सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे कारण आपण समृध्द झालो आहोत तर इतरांचाही विचार आपण करायला हवा तर देश प्रगतीपथावर जाईल.
सुत्रसंचलन श्रेयस उंबरकर यांनी केले आणि आकाश स्वामी यांनी आभार व्यक्त केले.