डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी
![Dr. Demand for immediate arrest of the accused by filing a case for defaming the image of Babasaheb Ambedkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/ASP.jpg)
पिंपरी चिंचवड | आझाद समाज पार्टीचे युवक आघाडी पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे यांनी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केली आहे.सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे यांनी याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे कि, 24 ऑगस्ट रोजी तळेगाव येथील आंबी मधील शेतकऱ्यांना घेऊन आझाद समाज पार्टीचे युवक आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. चव्हाण यांना शेतकरी हिताशी काहीही देणेघेणे नसून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेला खालच्या पातळीवरील प्रयत्न आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, संतोष चव्हाण यांनी पायात बूट घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन हे आंदोलन केले. तिथे असलेल्या पोलिसांनी संतोष चव्हाण यांना याबाबत समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना देखील ‘मला नका शिकवू. मला कळते’ अशा भाषेत उलट उत्तर दिले.
संतोष चव्हाण यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे अमिश दाखवून त्या बदल्यात लाखो रुपयांची मागणी केली असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी संतोष चव्हाण यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.