ऑक्सिजन पुरवठ्यात जिल्हा प्रशासनाचा पिंपरी-चिंचवडला दुजाभाव!
![MLA Mahesh Landage's hit: Pimpri-Chinchwad gets oxygen supply in the morning!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Untitled-design-4.jpg)
– ‘तो’ टँकर अखेर पकडला, आमदार महेश लांडगे आक्रमक
– … तर शहरातील शेकडो कोविड रुग्णांचे प्राण धोक्यात
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये जिल्हा प्रशासन दुजाभाव करीत आहे. शहरासाठी पाठवला टँकर ऐनवेळी पुण्याकडे वळवण्याचा प्रयत्न आमदार महेश लांडगे आणि महापालिका अधिकाऱ्यांनी मंगळवारी हाणून पाडला.
शहरात कोविड- १९ रुग्णांसाठी लागणारा ऑक्सिजन आज रात्री (मंगळवारी) संपणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पिंपरी-चिंचवडला पाठवलेला ऑक्सिजन टँकर ऐनवेळी पुण्याकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती मिळताच भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि महापालिका अधिकाऱ्यांनी अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. अखेर सायंकाळी ॲटो क्लस्टर येथील कोविड केअर सेंटरमध्ये संबंधित टँकरमधील ऑक्सिजन खाली करुन घेण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे.
शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. शासकीय रुग्णालयांसाठी आणलेला ऑक्सिजन एक टँकर कालही (सोमवारी) पिंपरी-चिंचवडला दिला नाही. त्यानंतर मंगळवारी पुन्हा प्रशासनाने ऐनवेळी ऑक्सिजन टँकर न देण्याचा निर्णय घेतला. याबाबत लोकप्रतिनिधींनी विनवनी करण्यासाठी संपर्क केला. पण, प्रतिसाद मिळाला नाही. रेमडेसिवीर इंजक्शनच्या बाबतीतही तिच परिस्थिती होती. त्यामुळे अन्न औषध प्रशासन पिंपरी-चिंचवडला दुजाभाव करीत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आरोग्य सुविधा आणि साधणे उपलब्ध करुन देताना जिल्हा प्रशासन अथवा अन्न औषध प्रशासनाने पिंपरी-चिंचवडवर दुजाभाव करु नये. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
…तर शहरात मृतदेहांचे खच पडतील!
शहरातील कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतानाच आज रात्री (मंगळवार) पुरेल इतकाच ऑक्सिजन खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही, तर ऑक्सिजन बेडवर असलेले शेकडो रुग्ण दगावण्याची भिती आहे. विशेष म्हणजे, ऑक्सिजन बाबत आजची रात्र वैऱ्याची होती…अशी कबुली अधिकारी देत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आडमूठ्या भूमिकेमुळे रुग्ण दगावल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.