Dilip Mohite Patil: चाकणमधील ‘या’ कंपनीच्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्याचे आदेश!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/FB_IMG_1583169712309.jpg)
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
चाकण एमआयडीसी परिसरातील तीन कंपन्यांमधील कामगारांना अचानक काढून टाकण्यात आले होते. यामध्ये स्थानिक कामगारांचे प्रमाण अधिक आहे. संबंधित कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घेण्याचे आदेश कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार दिलीप मोहिते- पाटील यांनी दिली आहे.
कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनामध्ये सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित विभागाचे प्रधान सचिव, कामगार आयुक्त, अप्पर कामगार आयुक्त उपस्थित होते. तसेच, चाकण औद्योगिक वसाहतीमधील गेडिया कंपनी, मार्स इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व जेबीएम या कंपनीचे जबाबदार प्रतिनिधी उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते- पाटील म्हणाले की, तीनही कंपन्यांमधील स्थानिक कामगारांना अचानकपणे कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. या बैठकीमधे कामगार मंत्री यांनी गेडिया कंपनी मध्ये कामगारांना तात्काळ कामावर घेण्याचे आदेश दिले,तसेच जेबीएम कंपनी कामगारांकडून लेखी आश्वासन घेऊन तात्काळ त्यांना कामावर घेण्यात यावे व मार्स कंपनीमध्ये तीन दिवसामध्ये कामगारांना कामावर घ्यावे, असे आदेश दिले आहेत.