पिंपरी चिंचवड शहरात १ हजार ४५० घरांमध्ये आढळल्या ‘डेंगीच्या अळ्या’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/www.mahaenews.com-29-780x470.jpg)
पिंपरी : घर व परिसरामध्ये साफसफाई न ठेवल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होते. पिंपरी चिंचवड शहरातील अशा घरांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत २२ दिवसांत १ हजार ४५० घरांमध्ये डेंगीच्या आढळून आल्या आहेत. त्या घरमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ७२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. घरांसोबत शहरातील पंक्चर व भंगाराची दुकाने, बांधकामे व इतर ठिकाणाची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू, मलेरिया यासह साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून पाहणी करण्यात येत आहे. शहरात डेंगी डासांची पैदास होणारी ठिकाणी नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये शहरातील घरे, जुनी व नवीन बांधकामे तसेच, पंक्चर व टायर आणि इतर आस्थापनांची तपासणी केली जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाच्या वतीने गेल्या २२ दिवसांमध्ये १ लाख १ हजार १९५ घरांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ हजार ४५० घरांमध्ये डेंगीच्या आळ्या आढळल्या. तर २८२ टायर व पंक्चर आणि भंगारच्या दुकानाची तपासणी करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. याठिकाणी पाणी साचत असल्याने त्यामध्ये डेंगीच्या अळ्यांची पैदास होते. पथकाच्या वतीने अशा २८० बांधकामांचीही तपासणी करण्यात आली. डेंगीच्या अळ्या आढळलेल्या ठिकाणच्या मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा मालकांची संख्या १४ असून, त्यांच्याकडून ७२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ज्या नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता ठेवलेली नाही, अशा ५८५ मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा – लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान, एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांचा अर्ज
शहरामध्ये आरोग्य विभागाच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये डास आणि डेंगीच्या अळ्या सापडलेल्या घरमालकांना नोटीस बजावण्यात आली असून, काही जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावे. कुंड्या, फ्रीजच्या खाली, आदी ठिकाणी पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. परिसरात पाणी साचू देऊ नये. त्यामुळे डासांची पैदास होणार नाही. पंक्चर व भंगार दुकाने व बांधकाम ठिकाणाचीही तपासणी केली जाणार आहे, असे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.