बांधकाम कामगारांना विविध योजनांचे लाभ तातडीने देण्याची मागणी
![Demand for immediate payment of benefits of various schemes to construction workers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-12T195414.528.jpg)
पिंपरी चिंचवड | बांधकाम कामगारांच्या विविध योजनांचे लाभ तातडीने मिळत नाहीत. त्यास कालावधी लागतो. म्हणून ऑनलाइन पद्धतीने तपासण्यात येणारे अर्ज लवकरात-लवकर तपासून त्यातील त्रुटी दूर कराव्यात. कामगार वर्गांना तत्काळ लाभ द्यावा, अशी मागणी राज्यातील संघटनांनी केली. त्यावर ऑनलाइन पद्धतीतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चू. श्रीरंगम यांनी दिले .मुंबई येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळांमध्ये महाराष्ट्र राज्यातील संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, सालिम शेख, उमेश डोर्ले, बालाजी इंगले आदी राज्यातील प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
यावेळी काशिनाथ नखाते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री हसन मुश्रीफ बांधकाम कामगारांना दिवाळीचा बोनस देण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यानुसार प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीला पाठवण्यात आला आहे. दिवाळी जरी झाली तरी बोनसचा लाभ देण्यात यावा. कोरोना कालावधीमध्ये ज्या कामगारांचा मृत्यू झाला आहे. अशा कामगारांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये देण्यात यावे.
कोरोना कालावधीमध्ये अनेक कामगारांचे बँक खाते बंद पडले. त्याचबरोबर बँकांचे विलीनीकरण झाल्यामुळे बँक खाते बदलले. अनेक कामगारांना वेगवेगळे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे नवीन बँकांची माहिती संकलित करून त्यांनाही लाभ देण्यात यावा. यासाठी संगणकांमध्ये आवश्यक तो बदल करावा अशी मागणीही त्यांनी केली.
ऑनलाइन पद्धतीची अर्जाची तपासणी लवकर होत नसल्यामुळे इतर लाभ मिळत नाहीत. बऱ्याच वेळा ते रद्द केले जात आहेत. हे न करता कामगारांना संधी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तपासणीसाठी अनेक वेळा कालावधी लागतो. याचाही विचार करावा. या सर्व त्रुटी दूर केल्या जातील असे आश्वासन श्रीरंगम यानी दिले.