वाहतुकीला अडथळा ठरणारा डीपी हटवा
![Delete DP that obstructs traffic](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/IMG-20210822-WA0004-e1629610238428.jpg)
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांची मागणी
पिंपरी चिंचवड | चिखली येथे देहू-आळंदी मार्गावरून पाटीलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेला महावितरणचा डीपी वाहतुकीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा डीपी तातडीने अन्यत्र सुरक्षित स्थळी हलविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांनी केली आहे.चिखली गावातील पाटीलनगर परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहनांची संख्या आणि वर्दळ यातही मोठी वाढ झाली आहे. वाढत्या वाहतुकीमुळे चिखली भागातील अंतर्गत रस्ते अपुरे पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या कोंडीचा वाहन चालकांसह स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या चिखली येथे देहू-आळंदी मार्गावरून पाटीलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी उग्र रूप धारण करू लागली आहे. त्याला रस्त्यालगतचा महावितरणचा डीपी कारणीभूत ठरू लागला आहे. त्यामुळे हा डीपी सुरक्षित स्थळी हलविण्याची गरज असल्याचे यादव यांनी सांगितले.