पिंपरी-चिंचवडमध्ये धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर!
आयुक्त शेखर सिंह : सुमारे १००० नागरिक निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरीत
![Dangerous, place, residence, citizen, shelter, center, migration, Shekhar Singh, 1000, Citizen, Shelter,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/nagari-nivara-780x470.jpg)
पिंपरी : अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. या स्थळांची पाहणी करून धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सुमारे १००० नागरिकांना आज महानगरपालिकेच्या वतीने निवारा केंद्रांमध्ये तसेच नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
पूरसदृश्य भागांची पाहणी करून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू असून ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील बौद्धनगर, आंबेडकर कॉलनी आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ३० नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील जाधवघाट, रावेत आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून २९ नागरिकांना येथे वाल्हेकरवाडी नवीन मनपा शाळा इमारत येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘क’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रिव्हर रेसिडेन्सी, चिखली जवळील मनपा मैलाशुद्धीकरण केंद्रातील लेबर कॅम्प आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून ८० नागरिकांना भोसली येथील सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत चौदे चाळ, चौदे घाट, विशालनगर, पिंपळे निलख याठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे ५० नागरिकांचे इंगोवले मनपा शाळा, पिंपळेनिलख गावठाण शाळेत स्थलांतरण करण्यात आले आहे.
‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रामनगर बोपखेल आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून ८३ नागरिकांना बोपखेल मनपा शाळेतील निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत संजय गांधी नगर, जगताप नगर या ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे २७ नागरिकांना यशवंतराव चव्हाण प्राथमिक मनपा शाळा तसेच कमला नेहरू मनपा शाळा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
पूर परिस्थितीवर नियंत्रण कक्षाद्वारे लक्ष…
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत जुनी सांगवी येथील मुळानगर, मधुबन सोसायटी येथील ११८ नागरिकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळा येथे स्थलांतर करण्यात आले आहे. अद्याप शहरातील विविध ठिकाणी नियंत्रण पथके तैनात असून बचावकार्य सुरू आहे. संपुर्ण परिस्थितीवर मुख्य नियंत्रण कक्षाद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आयुक्त शेखर सिंह प्रत्येक घटनेचा आढावा घेत आहेत.