बिटकॉइनची खंडणी मागत स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या तब्बल २७ सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्व्हरमधील डेटा इनस्क्रिप्ट करून सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. यासह डेटा पूर्वपदावर आणण्यासाठी बिटकॉइनची खंडणी मागितल्याचेही पोलिसांनी सांगितले.
टेक महिंद्रा कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लक्ष्मीनारायण लाठी (रा. हडपसर, वय ५५) यांनी याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाची सर्व्हर रूम निगडी, प्राधिकरण येथील अस्तित्व हॉल येथे आहे.
येथे या प्रकल्पात टेक महेंद्रासह तीन कंपन्या काम करतात. येथील सर्व्हरवर हा हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. २७ सर्व्हरमधील डेटा इनस्क्रिप्ट करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार २६ फेब्रुवारी २०२१ ला घडला असून याप्रकरणी ९ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा डेटा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अज्ञातांकडून बिटकॉइनची खंडणी मागितल्याचे पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुंगार यांनी सांगितले.