विनापरवानगी झाडे तोडली, ठेकेदारासह जागा मालकांवर गुन्हा दाखल
![Cut down trees without permission, file charges against landowners including contractors](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/4tree_cutting_2.jpg)
पिंपरी महाईन्यूज
महापालिकेच्या उद्यान विभागाकडून 13 झाडांचा विस्तार कमी करण्याची परवानगी घेतली. त्या परवानगीच्या व्यतिरिक्त जागा मालकाने कॉन्ट्रॅक्टरला सांगून सहा झाडे तोडली. याबाबत जागा मालक आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी अडीच ते साडेचार वाजताच्या कालावधीत गुलाब पुष्प उद्यानाजवळ, गवळीमाथा ते नेहरुनगर रस्ता, एमआयडीसी भोसरी येथे घडली.
मुख्य उद्यान अधीक्षक प्रकाश मोगल गायकवाड (वय 58) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज संतु वाघमारे (रा. मु.पो. माले, ता. मुळशी, जि. पुणे), इंद्रजित हरदयाळसिंग चव्हाण (वय 42, रा. नेहरुनगर, पुणे) यांच्या विरोधात महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमण) अधिनियम 1964 चे कलम 3(1), 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज वाघमारे याची गुलाबपुष्प उद्यानाजवळ एमआयडीसी भोसरी येथे मोकळी जागा आहे. त्याने 22 फेब्रुवारी 2021 रोजी त्याच्या मोकळ्या जागेतील तीन रेनट्री, एक भोकर, तीन निलगिरी, तीन काटेरी बाभुळ, तीन काटेरी बाभुळ पडलेली अशा एकूण 13 झाडांचे धोकादायक विस्तार कमी करण्यासाठी उद्यान विभागाकडे अर्ज दिला होता.
त्यानुसार 6 एप्रिल रोजी क क्षेत्रीय कार्यालयाचे उद्यान सहाय्यक संतोष लांडगे यांनी सदर ठिकाणी जावून तेथील वृक्षांची पाहणी केली. मनोज वाघमारे यांनी अर्जात नमुद केलेली झाडे सुस्थितीत उभी असल्याचे तसेच त्या झाडांच्या आजुबाजुस मनोज वाघमारे यांच्या मालकीची इतर झाडे देखील सुस्थित उभी असल्याचा अहवाल लांडगे यांनी महापालिकेला दिला.
त्यानंतर 6 एप्रिल रोजी मुख्य उद्यान अधीक्षक गायकवाड यांनी वाघमारे यांना त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागेतील झाडांचे धोकादायक विस्तार छाटणीची परवानगी दिली. 10 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गायकवाड यांना माहिती मिळाली की, गुलाब पुष्प उद्यानाचे शेजारी नेहरुनगर येथे एका खाजगी जागेमध्ये वृक्षतोड चालु आहे. त्यानुसार उद्यान विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
वाघमारे यांच्या जागेत चार ते पाचजण वृक्षतोड करत होते. त्यांच्याकडे वृक्षतोडीचा परवाना मागितला असता त्यांच्याकडे याबाबतची परवानगी नसल्याचे समोर आले. 13 झाडांचा धोकादायक विस्तार कमी करण्याव्यतिरिक्त आरोपींनी तीन विलायती चिंच, एक स्पथोडीया झाड, दोन करंज अशी सहा झाडे तोडली. तोडलेल्या झाडांचे वय अंदाजे 15 ते 20 वर्ष होते. याबाबत जागा मालक वाघमारे आणि कॉन्ट्रॅक्टर चव्हाण या दोघांच्या विरोधात पालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. बी. चापाले तपास करीत आहेत.