चित्रपट इंडस्ट्रीजसाठी सुविधा निर्माण करा – अभय भोर
पिंपरी चिंचवड | राज्यात चित्रपट इंडस्ट्रीजला चांगले दिवस येण्यासाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यासाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यात भोर यांनी म्हटले आहे की, मूलभूत सुविधा निर्माण केल्यास राज्यात रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होऊन बाहेरील राज्यात जाणारे रोजगार थांबतील. सध्या महाराष्ट्रात चित्रपट निर्मिती करावयाचे झाल्यास मोठ्या अडचणींना कलाकारांना निर्मात्यांना सामोरे जावे लागते. शेकडो परवानग्या अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे अनेक चित्रपट निर्माते गोवा, हैदराबाद, कलकत्ता, राजस्थान सारख्या ठिकाणी आपले शूटिंग करण्यासाठी जात असतात.
पुण्यासारख्या शहरामध्ये नवीन स्टार्ट अपमध्ये तरुणांना रोजगार निर्मिती करण्यासाठी व ट्रेनिंग घेण्यासाठी सिने फोटोग्राफी, फिल्म संपादन, फिल्म लेखन, केशरचना, वेशभूषा, साउंड टेक्नॉलॉजी, पब्लिसिटी, डिझाईन, फायटर, डान्सर असे अनेक ट्रेनिंग कोर्स उपलब्ध केल्यास अनेक तरुणवर्ग चित्रपट व्यवसाय निर्मिती क्षेत्रात येऊ शकेल. तसेच शहरामध्ये कलाकारांसाठी गेस्ट हाऊस उघडल्यास आजूबाजूच्या शहरातून पुणे शहरात शूटिंगसाठी येणारे कलाकारांना राहण्याची सुविधा निर्माण झाल्यास तो एक मोठा फायदा होईल. अनेक चित्रपट निर्मात्यांना अनेक कामगार संघटनेच्या अटी या कधीकधी पूर्ण करता येत नाही, असे भोर यांनी म्हटले आहे.