#Covid-19thirdwave : बालकांच्या संरक्षणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्रिसदस्यीय समिती
![4,000 people will get a direct account grant of Rs 1,400 for purchasing compost bins](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/pcmc-6.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
कोविड१९ रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या कृती दल (टास्क फोर्स) यांना माहिती देण्याकरीता महापालिका स्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आज आदेश निर्गमित केले आहेत.
प्रभारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप हे या समितीचे प्रमुख असतील तर नागरवस्ती विकास योजना विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांची समिती सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, बाधित व्यक्ती आणि मृत्युंचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने पालक गमावलेल्या आणि अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या राज्यात निर्माण झाली आहे. ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बाल कामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांचा बळी ठरण्याची ठरण्याची शक्यता जास्त आहे. अशा बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे आवश्यक आहे. त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यासाठी, सतेच कोविड१९ रोगाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्यास अशी बालके सुरक्षित निवारा, योग्य पोषणापासून वंचित राहण्याची तसेच त्यांच्या शोषणाची जोखीम वाढते. त्यामुळे या परिस्थितीत अशा बालकांसाठी अतिरिक्त प्रयत्न आवश्यक असल्याने जिल्हास्तरावर जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठीत करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा तातडीने शोध घेवून त्यांचा अचुक माहिती कृती दलाला उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकास्तरावर अधिका-यांची समिती गठीत केली आहे.