कोरोना घटला अन् साथीच्या आजारांसह विषाणूजन्य आजाराने रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी
![Corona has decreased and there is a huge rush in hospitals due to viral diseases including epidemics](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/file76vga8l4j1cyccden9u-1146596644-1577340872.jpg)
पिंपरी / चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात रिमझिम पाऊस सातत्याने सुरू आहे. सध्याच्या या दमट वातावरणामुळे साथीच्या आजारांसह विषाणूजन्य आजाराने चांगलेच डोकेवर काढले आहे.दुसरीकडे शहरातील कोरोना रूग्ण संख्येचा आलेख झपाट्याने खाली येत असतानाच सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, अतिसार हे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे महापालिकेची रूग्णालये, दवाखाने, खासगी रूग्णालये, क्लिनिकमध्ये रूग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाळी वातावरण असल्याने वातावरणात गारवा आहे.दूषित हवा, पाणी, अन्नासोबत प्रदूषित परिसर यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती झाल्याने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी खबरदारी घ्यायला हवी. रहिवासी भागांसह विविध भागांतील रस्त्यांवरील खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे. शिवाय पाण्याने बऱ्याच ठिकाणी कचरा कुजल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
सतत सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांची चाळण झाली आहे. विविध भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. त्यात पाणी साठल्याने ते आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यासाठी निमंत्रण देत आहेत. तसेच एकीकडे शहरातील कोरोना रूग्ण संख्या सातत्याने कमी होत असताना साथीचे आजारांचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालये, क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे.
पावसाळी वातावरण, विषम हवामान तसेच दूषित पाण्यामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशा आजारांचे प्रमाण सध्या वाढले आहे. चिंतेची बाब म्हणजे यात लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे लहान मुलांच्या दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे. पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. शक्यतो घरातील अन्नपदार्थ खाण्यास द्यावेत. पाणी उकळून पाजावे. एकाचा आजार दुसऱ्याला होणार नाही, यासाठी संपर्क खंडित करावा. आजाराची लक्षणे जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आराम करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत.