संविधान दिन: नागरिकांच्या सक्रिय सहभागातून भारतीय संविधानाची जागृती!
पुनावळे येथील डी.एस.के. कुंजबन सोसायटीत नागरिकांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड | डी. एस. के. कुंजबन सोसायटी, काटे वस्ती, पुनावळे येथे संविधान दिन दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सोसायटीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्यात महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन श्री. निलेश रायकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम् गाण्याने झाली, त्यानंतर वक्ते व पाहुण्यांचा परिचय करून विद्या जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीदांचे शौर्यस्थळावर स्मरण करण्यात आले.

हेही वाचा : पुणे जिल्हा रुग्णालयाला तीन वाहनांची देणगी
उपस्थितांनी सामूहिकपणे संविधान उद्देशिका (Preamble) वाचन केले आणि मान्यवरांच्या हस्ते संविधान पूजन केले. श्री. रत्नाकर यांनी संविधानाविषयी सखोल माहिती दिली तसेच संविधानाचे महत्त्व आणि सायबर क्राईम या विषयांवर जनजागृती केली. पुनावळे नगरचे कार्यवाह श्री. निलेश रायकर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत तत्त्वे आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या यावर मार्गदर्शन केले. त्यांनी ‘पंचपरिवर्तन’ या संकल्पनेची ओळख करून देत सकारात्मक बदलासाठी नागरिकांना प्रेरित केले. कार्यक्रमात कु. अनन्या लेले यांनी गायन सादर केले.
भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेलेरत्नाकर करंकाळ यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला आणि त्यानंतर उपस्थित नागरिक, सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संविधान पूजन केले. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे यश नागरिकांच्या उत्साही सहभागामुळे शक्य झाले असून, संविधानाची महती आणि जबाबदाऱ्यांची जाणीव जागृतीसाठी हा एक आदर्श उपक्रम ठरला.
संविधान आपल्याला फक्त अधिकार देत नाही, तर जबाबदाऱ्या ही सांगते. प्रत्येक नागरिकाने समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न करणे हीच खरी कर्तव्यबोधाची ओळख आहे.
– निलेश काळे, सचिव, डी.एस.के. कुंजबन सोसायटी.




