पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित मृतांच्या आकडेवारीत घोळ; स्मशानभूमीत 979 जणांच्या मृत्यूची जादा नोंद
![93 deaths in Pimpri-Chinchwad due to corona; Registration of 1 thousand 327 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/10-5.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
कोरोनाने पिंपरी चिंचवड शहरात थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, कोरोनाबाधित मृतांचे आकडे प्रसिद्ध करताना महापालिका वैद्यकीय प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे. वैद्यकीय प्रशासनाकडे कमी आणि स्मशानभूमी रजिस्टर जादा आकडेवारी नोंद असल्याचे आढळून आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात 1 एप्रिल ते 23 एप्रिलदरम्यान झालेल्या मृत्यूबाबत महापालिकेनं प्रसिद्ध केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतावर केलेल्या अंत्यसंस्काराच्या आकडेवारीत सुमारे 979 जणांची तफावत आढळून येवू लागली आहे. या मृत्यूची माहिती प्रशासनाने लपविल्याचा आरोप होवू लागला आहे.
आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एकूण 3 हजार 692 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एप्रिल महिन्यात 1 ते 23 तारखेदरम्यान झालेल्या कोरोना बधितांच्या मृतदेहावर महापालिकेच्या वतीने भाटनगर स्मशानभूमीत 743, भोसरी स्मशानभूमीत 601, निगडी स्मशान 358 आणि सांगवी 118 असे एकूण 1820 अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
मात्र, हीच बाब प्रसिद्ध करण्यासाठी जेव्हा प्रशासनाकडून लेखी आकडेवारी देण्यात आली. तेव्हा या कालावधी दरम्यान 841 कोरोनाबधितांचाच मृत्यू झाल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही आकडेवारीत तब्बल 979 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद नसल्याची तफावत दिसून आल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या संपूर्ण प्रकाराविषयी काहीही माहीत नसल्याचे सांगत योग्य ती माहिती घेऊन खुलासा करणार असल्याचे कोविड-19 प्रवक्त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, मृतांच्या आकड्याची लपवाछपवी केल्याने या प्रकरणी स्वतंत्र चाैकशी करावी, अशी भाजपकडून चाैकशीची मागणी होत आहे.