महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना 31 जानेवारीपर्यंत ‘बायोमेट्रीक थम्ब’मध्ये सवलत
![Concessions in ‘Biometric Thumb’ to Municipal Officers, Employees till 31st January](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/biometric.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात ओमायक्रॉन, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याने महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. 31 जानेवारी 2022 पर्यंत ही सवलत असणार आहे. याबाबतचा आदेश प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी काढला आहे.कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचा-यांना सप्टेंबर 2021 पासून थम्ब इम्प्रेशन, फेस रिडींग मशिनद्वारे बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात आली होती. सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा (ओमायक्रॉन) प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन, फेस रिडींगसाठी कामाच्या वेळेत हजेरी नोंदविण्यासाठी बायोमेट्रीक मशिनसमोर कर्मचा-यांची गर्दी होत आहे. त्यामुळे कर्मचा-यांना कोरोना विषाणूची लागण होऊन प्रसार होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन, फेस रिडिंग प्रणालीतून 31 जानेवारी 2022 पर्यंत सवलत देण्यात आली.
अधिकारी, कर्मचा-यांना हजेरी पटावर नियमितपणे निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेत हजेरी पत्रकावर दैनंदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. त्यावर संबंधित आहरण-वितरण अधिका-यांनी स्वाक्षरी करुन नोंदी प्रमाणित कराव्यात. तसेच कार्यालयीन वेळेपेक्षा उशीरा येणा-या व लवकर कार्यालय सोडणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर पूर्वीप्रमाणेच रजा खर्ची टाकण्याची कारवाई संबंधित विभागामार्फत करावी असे आदेशात स्पष्ट केले आहे.