वैद्यकीय नियोजनासाठी ठेकेदाराला 35 लाखांचा मोबदला
![Compensation of Rs. 35 lakhs to the contractor for medical planning](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/pimpri-chinchwad-PCMC-e1635920045174-3.jpg)
पिंपरी चिंचवड | कोरोना प्रादुर्भाव काळात नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयात वैद्यकीय नियोजनाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला सहा महिन्यांच्या कामकाजापोटी 35 लाख रुपये देण्यात येणार आहेत.पिंपरी-चिंचवडमध्ये फेब्रुवारीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. त्यामुळे ‘पीएमआरडीए’ मार्फत नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालय सुरू केले. या रुग्णालयासाठी वैद्यकीय नियोजनासाठी सल्लागार सेवा, देखभाल-दुरुस्तीसाठी एएए हेल्थकेअर यांना कामाचे आदेश दिले. 22 मार्च 2021 रोजी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी रुग्णालयात 100 बेड ऑक्सिजनयुक्त, 50 आयसीयू, 50 एचडीयूप्रमाणे चालू करण्याचे आदेश दिले होते.
या संदर्भात कार्यकारिणी समितीही स्थापन केली. एएए हेल्थकेअर यांना 29 मार्च ते 28 मे 2021 या दोन महिन्यांसाठी कामाचे आदेश दिले. 31 ऑगस्ट रोजी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत त्यांना 29 मे ते 15 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली. या कालावधीतील कामापोटी त्यांना 43 लाख 75 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्थायी समिती सभेत या कामापोटी एएए हेल्थकेअर यांना 43 लाख 75 हजार रुपयांऐवजी 35 लाख रुपये देण्याच्या खर्चास उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली.