आला उन्हाळा : पाणी काटकसरीने वापरा; गैरवापर टाळा!
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
![Come Summer : Use water sparingly; Avoid abuse!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Water-780x470.jpg)
पिंपरी: उन्हाळा सुरु झालेला आहे. येणारा पावसाळा जून मध्ये सुरु होईल यांची शाश्वती नाही. पावसाळा हा विलंबाने सुरु झाल्यास पाण्याची टंचाई शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणी आतापासून सर्व नागरिकांनी काटकसरीने व जपून वापरणे अत्यावश्यक आहे. यासाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळणे आवश्यक आहे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
यासाठी सर्व नागरिकांनी पिण्याचे पाणी हे घरगुती वापरासाठी योग्यरित्या व काटकसरीने वापरावे. पाणी हे शिळे होत नसल्याने शिल्लक असलेले पाणी फेकून देऊ नये. त्या पाण्याचा पुर्नवापर करावा तसेच, पिण्याचे पाणी हे वाहने स्वच्छ करणे, बागकाम व कुंड्यासाठी, घर किंवा इमारत व परिसर स्वच्छ करणेसाठी, धुण्यासाठी वापरू नये. तसेच, सर्व सोसायटी धारकांनी एस.टी.पी. आणि बोअरवेल सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सदनिकांनामध्ये स्वच्छतागृह, सोसायटी अंतर्गत उद्यान परिसराची स्वच्छता इत्यादींसाठी वापरावे, जेणेकरुन पिण्याच्या पाण्याची बचत होईल.
पिण्याच्या पाण्याचा गैरवापर गाड्या धुणे, रस्ते धुणे, घर, सोसायटी परिसर धुणे यासाठी करत असल्याचे निदर्शनास आलेस सदर ग्राहकांना गैरवापर होत असल्याबाबत प्रथमतः नोटीस बजाविण्यात येईल. तदनंतरही पुन्हा दुसऱ्यांदा असा पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करताना कोणीही आढळल्यास कोणतीही सबब, ऐकूण घेतली जाणार नाही व तात्काळ नळजोड तोडण्यात येईल.
तरी सर्व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पाणी हे जीवन आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. ते जपून वापरावे म्हणजे पाण्याची बचत होईल व यामुळे यावर्षी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत म्हणजे माहे- जुन व जुलै पर्यंत पाणी सर्वांना पुरेसे उपलब्ध होऊ शकेल आणि पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही व यंदाचा उन्हाळा सर्वांना सुसह्य जाईल.
एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याची बचत खालीलप्रमाणे सहज करु शकता…
पिण्याचे पाणी वाहने स्वच्छ करण्याकरिता वापरु नका. अंगण, जिने किंवा फरशी धुणे टाळा, स्वच्छतेकरिता कमीत कमी पाण्याचा वापर करा. घरातील गळणारे नळ तत्काळ दुरुस्त करुन घ्या. घरासमोरील रस्त्यावर पाणी मारु नका, रस्ते धुवू नका. कुंड्यातील झाडे, बागकामासाठी पिण्याचे पाण्याचा वापर करु नका. तरी सर्व नागरिकांना आवाहन करणेत येते की, सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काटकसरीने पाणी वापरावे व पाण्याची बचत करावी, जेणेकरुन येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.