कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी लहान मुलांची रुग्णालये सुरू करावीत – अनिकेत काटे
- आयुक्त राजेश पाटील यांच्याशी केली बराच वेळ चर्चा
पिंपरी / महाईन्यूज
कोरोनाच्या तिस-या लाटेचा फटका चुकविण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्याची गरज आहे. बालरोग तज्ञांची टिम कार्यरत ठेवून योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्वीकृत सदस्य अनिकेत राजेंद्र काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात काटे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना (कोविड-19) या महामारीच्या दुस-या लाटेच्या संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शहरातील रूग्णांचे प्रमाण वाढणार आहे. लसीकरण केंद्राची संख्या कमी व अपुरा साठा राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतच जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढता मॄत्यूदर लक्षात घेता तसेच केंद्रीय आरोग्य तज्ञांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार भविष्यात कोरोनाची येणारी तिसरी लाट भयंकर आहे. यामध्ये लहान बालकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या उपचाराची मोठी समस्या निर्माण होणार आहे.
आतापर्यंत मोठ्या तसेच प्रौढ व्यक्तीसाठी रूग्णालय उपलब्ध केली आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत लहान बालकांकरीता स्वतंत्र कोरोना (कोविड-19) रूग्णालय नसल्याने अशा रुग्णालयाची निर्मिती करण्यात यावी. त्याकरीता बालरोग तज्ञांची व्यवस्था करावी, अशी मागणी काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.