आरोपी विरोधात 24 तासात दोषारोपपत्र सादर; 48 तासात आरोपीला शिक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/arrest-0-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
घरात घुसून महिलेशी अश्लील वर्तन करत एका व्यक्तीने तिचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तर न्यायालयाने 48 तासात आरोपीला सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली.
सुरेशकुमार मोहनलाल (वय 22, रा. वेताळनगर, चिंचवड. मूळ रा. जम्मू काश्मीर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके यांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. सरकारी पक्षातर्फे साधना बोरकर यांनी युक्तिवाद केला.
10 डिसेंबर रोजी दुपारी पीडित महिला घरात असताना आरोपी तिच्या घरात गेला. त्याने महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक विकास मडके यांनी केला. उपनिरीक्षक मडके यांनी 24 तासात आरोपीच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यासमोर दोषारोपपत्र सादर केले.
महिला विनयभंग व अत्याचार विषयक गुन्ह्यांचे न्यायालयीन कामकाज जलद गतीने व्हावे यासाठी या गुन्ह्याचे कामकाज जलदगतीने करण्यात आले. आरोपीवरील दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने 36 तासात सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलीस निरीक्षक किशोर पाटील, उपनिरीक्षक विकास मडके, पोलीस नाईक सचिन सोनपेटे, कोर्ट कर्मचारी पोलीस हवालदार सुरेश केदारी यांनी केली.