चिंचवडची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अर्बन स्ट्रीट डिझाईनमध्ये बदल करा: नगरसेवक मोरेश्वर शेडगे
![Change the urban street design to solve Chinchwad's traffic congestion: Corporator Moreshwar Shedge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-20-at-12.42.21-PM.jpeg)
पिंपरी । प्रतिनिधी
चिंचवड, चापेकर चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी येथे अर्बन स्ट्रीट करण्यात येणार आहे. यासाठी सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ‘ट्रायल ‘ घेत आहे. मात्र, यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. हीच परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी अर्बन स्ट्रीट डिझाईन मध्ये योग्य ते बदल व सुधारणा करण्याची मागणी भाजप नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक शेडगे यांनी म्हटले आहे की, सध्या अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार चिंचवडगावातील चापेकर चौकात सुशोभिकरणासाठी रस्त्यात पोती टाकून आखणी केली आहे. यामुळे चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. क्रांतिवीर चापेकर बंधुंचे चापेकर चौकात सामुहिक शिल्प आहे. यामुळे चौकास ऐतिहासिक महत्व आहे. सुशोभिकरण करण्यासाठी आमची हरकत नाही. पण, काही सुधारणा व बदल करणे आवश्यक आहे.
चापेकर चौकात वाहतूक कोंडी होणार नाही. याची दक्षता घेऊन डिझाईन करावे. चौकातील रस्ते मोठे प्रशस्त व रुंद करावेत. उड्डानपुलाखालील वाहन पार्किंग व्यवस्था शिस्तबद्ध ठेवावी. जोपर्यंत चिंचवड गावठाणातील विकास कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ती ‘मोफत’ करावी. रिक्षा वाहन स्थळे पाहणी करून पक्की करावीत. अधिकृत परवानाधारक हातगाड्यांची जागा निश्चित करावी. अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करावी. जेष्ठ नागरिक व सर्व सामान्य नागरिकांना चालता यावे. याकरिता जास्त रुंद नकोत पण व्यवस्थित फूटपाथ करावेत. चौकात अद्यावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा उभी करावी, अशा मागण्या नगरसेवक शेडगे यांनी निवेदनातून केल्या आहेत.