“माऊली – माऊलीं”च्या जयघोषात संजीवन समाधी दिन साजरा
!["माऊली - माऊलीं"च्या जयघोषात संजीवन समाधी दिन साजरा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Image-2021-12-02-at-7.13.01-PM.jpeg)
आळंदी | प्रतिनिधी
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम”…. असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष… दुपारचे बारा वाजले… घंटानाद झाला… समाधीवर पुष्पवृष्टी… संत नामदेव महाराज व माऊलींची भेट… अशा भावपूर्ण वातावरणात श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सप्त शतकोत्तर रौप्य संजीवन समाधी सोहळा गुरुुवारी माऊली माऊली’च्या जयघोषात उत्साहात पार पडला. संतश्रेष्ठ द्यानेश्वर महाराजांनी वयाच्या 21 व्या वर्षी समाधी घेतली.संत नामदेव महाराजांसह अवघा भक्त गण त्यावेळी गहिवरून गेला..! पण अवतारी पुरुष असे जात नसतात त्यांची शिकवण कायम असते याची जाणीव होत माऊलींचा समाधीचा सोहळा सुरू झाला..! यंदा सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने मोठा उत्साह आळंदीत पहायला मिळाला.
ज्ञानेश्वर महाराज यांचा कार्तिकी यात्रा २०२१ अंतर्गत संजीवन समाधी दिन सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी परंपरांचे पालन करीत गुरुवारी अलंकापुरी नगरीत साजरा झाला. या निमित्त श्रींचे संजीवन समाधी सोहळय़ाचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा संत नामदेवराय यांच्या वंशजांच्या परिवारातर्फे झाली. तत्पूर्वी माउली मंदिरात प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते श्रींना पवमान अभिषेक आणि दुधारती करण्यात आली. सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे परंपरेने श्रींचे संजीवन समाधी सोहळय़ातील कीर्तन झाले. महाद्वारात काल्याचे कीर्तन त्यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांच्या दिंडीची मंदिर प्रदक्षिणा पार पडली. दुपारी बाराच्या सुमारास श्रींचे संजीवन समाधीवर पुष्पवर्षांव, आरती आणि घंटानाद झाला. सोपानकाका देहूकर यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन त्यानंतर हैबतरावबाबा यांच्या वतीने हरिजागर करण्यात आले.
संत श्री. नामदेव महाराजांच्या वंशजांनी त्यांच्या पादुकांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून जयजयकार करत अलंकापुरीचा निरोप घेतला. “माऊली – माऊली” जयघोष करीत चोपदारांच्या वतीने माऊलींच्या पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घालून रात्री उशिरा ‘श्रीं’च्या गाभार्यात देवस्थानच्या वतीने नारळ – प्रसाद वाटून सोहळ्याची सांगता झाली असेप्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.