कॅबचालक, स्कूल बसचालकांना कोरोनाकाळातील कर्ज हप्त्यांमध्ये सूट द्या!
![Cab drivers, school bus drivers get relief from coronation debt killings!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/1dfcca18-9d62-49c7-9109-efcfa1ef583b.jpg)
- भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांची मागणी
- राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांना मागणीचे निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
कोरोना काळात आर्थिकदृष्टया संकटात सापडलेल्या कॅब चालक, स्कूल बसचालकांना राज्य सरकारने दिलासा द्यावा. कोरोना आणि लॉकडाउन काळात वाहन कर्ज, गृहकर्जावरील हप्त्यांना मार्च-२०२२ पर्यंत स्थगिती द्यावी. त्यानुसार शिखर बँक असलेल्या रिझर्व बँक ऑफ इंडियाला सूचना द्याव्यात, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांना मागणीचे निवेदन ई-मेल केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगभारात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातील परिस्थिती आता बहुतांशी नियंत्रणात येताना दिसत आहे. रुग्णसंख्या घटलेली आहे. मात्र, आता संभाव्य तिसऱ्या लाटेत पुन्हा नागरिकांना संकटाचा सामना करावा लागणार आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने आपआपल्या परीने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक मदत देण्याचीही भूमिका घेतली आहे. रिक्षाचालकांना मदत झाली आहे. मात्र, अनेक कॅबचालक, स्कूल बसचालक, वाहनचालकांना घराचे हप्ते, कर्जाचे हप्ते कसे भरावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाउनच्या काळात कोणत्याही बँकेने वाहनचालकांना हप्ते भरण्यापासून सूट दिली नाही. पहिल्या लाटेमध्ये तीन महिन्यांसाठी बँकांचा हप्ते भरण्यापासून मूभा दिली होती. मात्र, त्यानंतर चक्रीवाढ दराने व्याज आकारण्यात आले. यात कॅबचालक, वाहनचालकांची मोठी कुचंबना झाली आहे. कर्जाचे हप्ते, व्यावसाय ठप्प असल्याने दैनंदिन खर्च भागवताना या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
…तर कॅबचालक, स्कूलबस चालकांना दिलासा मिळेल!
कोरोना काळातील लॉकडाउन दरम्यानचे हप्ते न भरण्याची मुभा राज्यातील कॅब चालक, स्कूलबस चालक, वाहनचालकांना द्यावी. तसेच, त्यावर बँकांनी चक्रीवाढ दराने व्याज आकारु नये. कर्जांच्या हप्त्यांची मुदत वाढवून द्यावी. मार्च २०२२ पर्यंत कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती द्यावी. ज्यामुळे अर्थिकदृष्टया अडचणीत असलेल्या या घटकाला काहीसा दिलासा मिळेल. राज्यातील सर्वसामान्य कॅब चालक, स्कूल बस चालक , वाहनचालक हा बहुतांशी असंघटीत घटक आहे. कोरोना काळात आर्थिकदृष्टया या घटकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आपणांस विनंती की, आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या या घटकाबाबत सकारात्मक विचार करावा, असेही दीपक मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.