”CAA”च्या समर्थनार्थ पिपंरी-चिंचवडमध्ये घोषणाबाजी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पिंपरी-चिंचवडमधील भाजपशी संलग्न असलेल्या संस्था, संघटनांनी आज रविवारी (दि. 22) पाठिंबा दर्शविला आहे. विधेयकाच्या समर्थनार्थ पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ”I Support CAA”, ”We support CAA”, अशा आशयाचे फलक हाती घेऊन नागरिकांनी नारेबाजी केली.
नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत आणि राज्यसभेत मंजूर केल्यानंतर देशभरात या विरोधात लाट उसळली. दिल्ली ते तमिळनाडू आणि आसाम ते केरळपर्यंतच्या प्रमुख शहरांमध्ये जाळपोळ झाली. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. मुस्लिमविरोधी विधेयक असल्याचा गैरसमज पसरवून नागरिकांचा असंतोष भडकवण्याचा काहींच्याकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी गैरसमज बाळगून हिंसक कृत्य टाळावीत आणि या विधेयकाला पाठिंबा दर्शवावा, असे भाजपकडून आवाहन होत आहे.
आज पिंपरी-चिंचवडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शहरातील विविध सामाजिक, धार्मिक संघटनांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शविला. जवळपास 300 हून अधिक लोकांचा समूह विधेयकाला समर्थन दर्शविण्यासाठी पिंपरी चौकात एकत्रीत आला होता. त्यामध्ये भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजू दुर्गे आदींसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात केला होता.