breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक राजू रामा लोखंडेचा राष्ट्रवादीत प्रवेश; भाजपाला गळती सुरू

पिंपरी – चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक राजू रामा लोखंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.२०) भाजपाला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महापालिकेतील भाजपाच्या नगरसेविका आणि महिला बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे या लोखंडे यांच्या पत्नी आहेत. पिंपरी चिंचवड शहर भाजपातील आजी-माजी ४० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार आहेत, त्यातील हा पहिलाच एक धक्का आहे. आगामी काळात भाजपाला मोठी गळती लागलेली दिसेल असेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी राजू लोखंडे यांच्या राजकारणाचा ओनामा केला. २००२ ते २००७ मध्ये महापालिकेत नगरसेवक म्हणून लोखंडे हे पिंपळे गुरवचे नगरसेवक होते. शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्रातील वैदू समाजाचे नेतृत्व लोखंडे यांच्याकडे आहे. समाजाचे विविध प्रश्न घेऊन राजू लोखंडे हे शुक्रवारी अजित पवार यांना पुणे येथे विधानसभवनात भेटले. त्यावेळी वैदू समाजाबद्दल अजित पवार यांनी सहानुभूती दर्शविली आणि शक्यतो सर्व प्रश्न सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले. त्यावेळी राजू लोखंडे यांनी पवार यांच्या उपस्थितीच भाजपाला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. लोखंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे आमदार जगताप यांना त्यांच्याच घरातून आव्हान देण्याची राष्ट्रवादीची खेळी असल्याचे बोलले जाते. लोखंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आमदार जगताप यांचे सख्खे चुलत भाऊ आणि माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी घडवून आणला.

दरम्यान, लोखंडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, होय मी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वैदू समाज आजही शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या खूप मागासलेला आहे. राज्यात १४८ गावांतून आणि विशेषतः मराठवाड्यातून समाजाचे लोक आजही जगण्यासाठी धडपडत असतात, भटकंती करतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही अखिल महाराष्ट्र वैदू समाज संघटना स्थापन केली आहे. आता समाजाचा एक मेळावा घेणार आहोत. अजितदादांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले म्हणून मी केवळ सामाजिक भावनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आमदार लक्ष्मण जगताप हे माझे गुरू आहेत, त्यांनीच मला राजकारणात आणले. त्यामुळे त्यांना सोडून चाललो वगैरे असे काही नाही, मी त्यांचाच आहे, असेही राजू लोखंडे यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button