भाजपा नगरसेवक वसंत बोराटे यांचा अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
![BJP corporator Vasant Borate finally joins NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-16-at-20.26.45.jpeg)
पिंपरी । प्रतिनिधी
मोशी परिसरातील भाजपाचे नाराज नगरसेवक यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बोराटे यांनी ‘हातावर घड्याळ’बांधले.
मुंबईतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी गुरूवारी सकाळी बोराटे यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट आणि प्रवक्ते तथा निवडणूक प्रभारी योगेश बहल आदी उपस्थित होते.
नगरसेवक असताना राजकीय दबावाचे राजकारण करीत असल्याचा आक्षेप घेत. आमदार महेश लांडगे यांच्यावर नाराजी व्यक्त करीत नगरसेवक वसंत बोराटे यांनी नगरसेवकपदाचा बुधवारी राजिनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
माजी आमदार विलास लांडे यांनी अनुपस्थिती…
भोसरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांची बोराटेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिसली नाही. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पदभार स्विकारल्यानंतर भाजपाला पहिला धक्का देत राजकीय श्रेय घेण्यासाठी प्रवेश उरकला, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार विलास लांडे संघटनात्मक बदलामुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची अनुपस्थितीही दिसत होती.
प्रा. कविता आल्हाट यांची निर्णायक भूमिका?
मोशी प्रभाग क्रमांक ३ (नवीन प्रभाग) मधून प्रतिनिधीत्व करणारे वसंत बोराटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे स्थानिक राजकीय गणिते बदलणार आहेत. बोराटे यांच्या प्रवेशामागे महिला शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मोशीतील राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये खुला सामना होणार असून, राष्ट्रवादीच्या संभाव्य इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.