Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचा कर भरणा निर्धारीत वेळेतच!

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची माहिती

कर संकलन विभागाकडून माहिती मिळताच भरणा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन प्रक्रियेतील त्रुटींमुळे भाजपा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचा मिळकतकर वेळेत भरला गेला नसल्याची बाब समोर आली होती. मात्र प्रशासनाकडून सूचना मिळताच संबंधित कराची रक्कम निर्धारित वेळेत भरण्यात आल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली आहे.

महानगरपालिकेकडून मिळकतकर वसुलीसाठी खासगी संस्थांच्या माध्यमातून पावत्या वितरित केल्या जातात. याच प्रक्रियेत संबंधित कार्यालयाला कर पावती वेळेत प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे कर भरण्यात विलंब झाला. ३१ मार्च हा कर भरण्याचा अंतिम दिवस असल्याने प्रशासनाने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने कारवाई करत संपूर्ण थकबाकी भरल्याचे काटे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महापालिकेकडून सर्वसामान्य नागरिकांकडून कर वसुलीसाठी कडक भूमिका घेतली जाते. थकबाकीदारांवर मालमत्ता जप्त करणे, पाणीपुरवठा बंद करणे अशा कठोर उपाययोजना केल्या जातात. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयावरच पाच वर्षांचा कर थकीत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर चर्चा रंगली होती.

हेही वाचा         :                  To The Point:‘‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ चा खर्च वाढला..’’ असा गळा काढणाऱ्यांना विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी अप्रत्यक्ष आरसा दाखवला! 

या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न काटे यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “भारतीय जनता पक्ष सत्तेत असला तरी कर भरण्यापासून कोणतीही सूट मिळत नाही. आम्ही नियमांनुसार कराची रक्कम भरली आहे.” अभय योजनेची मुदत ३१ मार्च पर्यंत होती. त्या मुदतीमध्ये कर भरणा जमा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, या प्रकरणावरून होत असलेल्या राजकीय टिपण्णीबाबत काटे यांनी नाराजी व्यक्त केली. अपूर्ण माहितीच्या आधारे किंवा राजकीय हेतूने चुकीच्या चर्चा करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय ठेवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे महापालिकेच्या कर संकलन प्रक्रियेतील त्रुटी अधोरेखित झाल्या असून, पावती वितरण यंत्रणा अधिक कार्यक्षम करणे आणि समन्वय अचूक करण्याची गरज आहे, असे स्पष्ट होत आहे.

नियम सर्वांसाठी समान आहेत. कोणतीही तांत्रिक अडचण असली तरी जबाबदारी टाळली जाणार नाही. आम्ही निर्धारित वेळेत कर भरून पारदर्शकता आणि आमचे उत्तरदायित्व जपले आहे. राजकीय उद्देशाने टीपण्णी करणाऱ्यांनी निश्चिंत राहावे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्या कर्तव्याप्रती कटिबद्ध आहोत.

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button