प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागरमध्ये भाजपच्या प्रचाराचा उत्सव
भाजप उमेदवार अनिताताई संदीप काटे यांचे फुलांची उधळण, औक्षण व घोषणांनी स्वागत

पिंपरी-चिंचवड | पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे यांच्या प्रचाराने सध्या उत्सवाचे स्वरूप धारण केले आहे. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधताना नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ठिकठिकाणी फुलांची उधळण, औक्षण व घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
प्रचारादरम्यान अनिता काटे यांनी पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा तसेच महिलांच्या सुरक्षिततेसारख्या महत्त्वाच्या विषयांवर नागरिकांशी सविस्तर संवाद साधला. “विकासाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी नागरिकांचा पाठिंबा अत्यंत आवश्यक आहे. मागील काळात प्रभागात झालेली विकासकामे आणि भविष्यातील नियोजन नागरिकांसमोर मांडत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : पिंपरी विधानसभा क्षेत्रात विविध प्रभागात आमदार अमित गोरखे यांच्या बैठका
या प्रचारात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात, फलक व बॅनरच्या माध्यमातून प्रचाराला विशेष रंगत आली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच तरुण वर्गाकडून अनिताताई काटे यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नागरिकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांची तत्काळ नोंद घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे आश्वासन अनिता काटे यांनी यावेळी दिले. प्रभाग क्रमांक २८ मध्ये विकास, पारदर्शक कारभार व सातत्य राखण्यासाठी भाजपला संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.




