वृक्षांवरील रोषणाईमुळे जैवविविधता धोक्यात
पिंपरी : शहराच्या सौंदर्यात भर पडते, म्हणून अनेक ठिकाणच्या झाडांवर विद्युत रोषणाई केल्याचे दिसून येते. यामुळे झाडांचे नुकसान तर होतेच; परंतु झाडांवर अधिवास करणार्या जिवांना यामुळे धोका उद्भवत आहे, याकडे पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या उद्यान विभाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो झाडांवर केलेल्या विद्युत रोषणाईमुळे झाडांचे नुकसान होत आहे. व्यावसायिक लाभापोटी असे प्रकार केले जात आहेत. झाडांना खिळे ठोकून विद्युततारा सोडल्या जात आहेत. यामुळे झाडांची वाढ खुंटते आहे. परिणामी, पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. याशिवाय रात्री झाडांवर अधिवास करणार्या पक्ष्यांनाही त्याचा धोका होत आहे. विविध रंगांच्या एलईडी लाईट्स पक्ष्यांच्या जीवास हानिकारक असून जैवसंस्थेला धोकादायक असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
हेही वाचा : शरद पवार, उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत दिसतील; बच्चू कडू यांचा दावा
महापालिकेनेही अनेक ठिकाणी तर झाडांना रंगरंगोटी केलेली आहे. अशाप्रकारे खोडांना रंग चढवला गेल्यास त्यांचे आयुष्य कमी होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, ही कार्यवाही करण्यात येते का, असा प्रश्न उद्यान अधिकार्यांना विचारण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे महापालिकेच्या मालकीची आहेत. झाडांवर विद्युत रोषणाई करता येत नाही. ते वन्यजीव कायद्याचे उल्लंघन असल्याचे ग्रीन आर्मीचे संस्थापक प्रशांत राऊळ यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
…असा आहे वृक्षसंवर्धन कायदा
झाडांचे संरक्षण आणि संवर्धन कायदा 1975 नुसार झाडांवर विद्युत रोषणाई करणे, विद्युततारा, केबल सोडणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. झाडांवर तारा सोडायच्या असल्यास, तशी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे, मात्र अशी सरसकट परवानगी घेतली जात नाही. झाडांची हानी होत असून कायद्याचे उल्लंघन करत विद्युत रोषणाई केली जात आहे. त्याकडे महापालिका उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पाच वर्षांपासून आम्ही याबाबत पाठपुरावा करत आहोत. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये आम्हाला म्हाळसांकात चौकातील विद्युत रोषणाईबाबत पोलिसात तक्रार द्यावी लागली होती. कारण हा प्रकार वृक्षसंवर्धन कायदा, जैवविविधता कायदा, प्राणीजीवन कायद्याचे उल्लंघन करणारा होता.