BIG NEWS : भोसरीतील ‘लक्ष्मी दर्शन’ महाविकास आघाडीवर ‘बुमरँग’
उमेदवार अजित गव्हाणे यांचा दावा फोल : पैसे वाटप करताना स्वत:चेच कार्यकर्ते रंगेहात
![BIG NEWS : 'Lakshmi Darshan' in Bhosari is a 'boomrang' in Mahavikas Aghadi.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Ajit-Gavhane-7-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड : भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना गंभीर विषयावर संवाद साधायचा आहे, असा निरोप प्रसारमाध्यमांना दिला. महायुतीचे उमेदवार महेश लांडगे समर्थकांकडून ‘लक्ष्मीदर्शन’ बाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ केला जात आहे. पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप करण्यात आला.
विशेष म्हणजे, ‘‘पराभव समोर दिसू लागल्याने भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप केल्याची बदनामी’’ केली जात आहे, असा दावाही करण्यात आला. रविवारी दुपारी पत्रकार परिषद झाली आणि सायंकाळी सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्यामुळे ‘लक्ष्मीदर्शन’चा मुद्दा महाविकास आघाडीवर ‘बुमरँग’ झाला.
सदर ‘व्हीडिओ’मध्ये पंतनगर, चिखली येथील महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता दत्तात्रय जगताप यांना पैसे वाटप करीत असताना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे समर्थकांनी रंगेहात पकडला. सदर व्यक्ती मतदान कार्ड घेऊन आलेल्या व्यक्तीला पैसे वाटप करीत आहे. त्यामुळे मतदार संघामध्ये एकच खळबळ उडाली.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते अजित गव्हाणे?
भोसरी मतदारसंघांमध्ये शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे सापडले आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली, असा ‘फेक नेरेटिव्ह’ पसरवला गेला. यातून जाणीवपूर्वक नागरिकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न झाला. वारंवार अशा प्रकारचे प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होत आहेत. पोलीस, निवडणूक विभाग या सर्वांकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही. महाविकास आघाडीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव होताना दिसत आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक नागरिकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली असून गेल्या दहा वर्षातल्या दहशत, दडपशाहीला नागरिक चोख उत्तर देतील, असा दावा अजित गव्हाणे यांनी केला होता.
सहानुभूती मिळवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न…
भोसरी मतदार संघामध्ये दडपशाही, गुंडशाही आणि दहशत आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवार केला जात हाेता. तसेच, महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जात आहेत. तसेच, आमची बदनामी करण्यासाठी खोट्या बातम्या मतदार संघामध्ये पसरल्या जात आहेत, असा दावा करीत अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तासांतच त्यांचेच कार्यकर्ते पैसे वाटप करताना सापडले. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे महाविकास आघाडी आणि उमेदवारांचा सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न फसला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.