महिलेच्या गालाचा चावा घेत मारहाण; परस्पर विरोधी गुन्हे दाखल
![Beating](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/assault.jpg)
पिंपरी चिंचवड | किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. वाद घालणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तीने महिलेच्या गालाचा चावा घेत तिला तसेच तिच्या पतीला, सासूला मारहाण केली. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आळंदी येथे घडली.याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घराशेजारी आरोपी राहतात. फिर्यादी यांचा मुलगा रस्त्यावर खेळण्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ केली. फिर्यादी महिलेने याचा आरोपींना जाब विचारला. त्यावरून एका व्यक्तीने फिर्यादी यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या चुलत सासू आणि सख्या सासूला देखील मारहाण केली. आरोपी व्यक्तीने फिर्यादी यांच्या डाव्या गालाचा चावा घेतला. तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. आरोपींपैकी एकाने फिर्यादी महिलेच्या पतीच्या हाताच्या बोटाला चावा घेतला.
याच्या परस्परविरोधी 54 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. त्यानुसार पती, पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरासमोर उभे असताना आरोपींनी लाकडी काठीने, हाताने त्यांना, त्यांच्या पत्नीला मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी केली. आरोपी व्यक्तीने फिर्यादी यांच्या पत्नीचे कपडे फाडून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांच्या दोन्ही मुलांना देखील आरोपींनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.