सावधान! सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलींना ओढले जातेय जाळ्यात
![social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/21-26-56-images_202104593872-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना जाळ्यात ओढले जात असल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलींशी मैत्री करून त्यांना घरून पैसे व मौल्यवान वस्तू आणण्यास भाग पाडले जाते. अशाप्रकारे अनेक मुलींची फसवणूक करणा-ऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हाटसअप व इन्स्टाग्रामव्दारे चॅटिंग करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. यात अल्पवयीन विद्यार्थ्यांशीही जवळीक साधली जात आहे. त्यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन मौजमस्ती करीत असतात, अशी तक्रार पोलिसांकडे एका अर्जाव्दारे करण्यात आली होती. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, दरोडा विरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी याप्रकरणात चौकशी केली. यामध्ये एक रॅकेट सक्रीय असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
रॅकेटमधील संशयित इसम हे अल्पवयीन मुलींना इन्स्टाग्रामवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यांच्याशी मैत्री करून मुलींना घरून पैसे व मौल्यवान वस्तू आणण्यास भाग पाडतात. त्या पैशांतून मौजमजा करतात. संबंधित अल्पवयीन मुलींच्या पालकांना याबाबत माहिती झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. जबरदस्तीने पैसे आणणे, त्यांची फसवणूक करणे, कट रचणे, असा गुन्हा दाखल केला आहे.
आपल्या अल्पवयीन मुलांबाबत पालकांनी सतर्क राहिले पाहिजे. सोशल मीडियाचा ते कसा वापर करतात, कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात तसेच त्यांच्या प्रत्येक चॅटबाबत पालकांना माहिती असणे आवश्यक आहे. मुले सज्ञान होईपर्यंत त्यांची सर्वस्वी जबाबदारी पालकांवर असते.
– कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त