‘..अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन छेडू’; बाबा कांबळे यांचा इशारा
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
![Baba Kamble said that action should be taken quickly otherwise we will start agitation across Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Baba-kamble-780x470.jpg)
पिंपरी : बांधकाम मजुर कल्याण मंडळात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर आले आहे. या घोटाळ्याची चौकशी करा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. त्वरित कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडू असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.
निवेदनात म्हटले केले आहे की, गोरगरीब कष्टकरी बांधकाम मजुरांसाठी स्थापन करण्यात आलेल्या रस्ते व बांधकाम कल्याणकारी महामंडळामध्ये ३१४ कोटी कपाट खरेदी टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी देखील मध्यान भोजन योजना, बोगस लाभार्थी योजनासह इतर विविध योजनेमध्ये १ हजार करोड रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते. परंतु याची चौकशी न झाल्यामुळे व संबंधित घोटाळ्यातील कोणावरही कारवाई झाली नाही.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची ठाणे येथे बदली
अडीच लाख रुपये किमतीचे कपाट १५ लाखांपेक्षा अधिक किमतींमध्ये खरेदी करण्यात आले आहेत. हे सर्व प्रकरण अत्यंत गंभीर असून गोरगरीब कष्टकरी बांधकाम मजुरांसाठी स्थापन करण्यात आलेल्या बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी मंडळामध्ये अशा प्रकारे लाखो करोड्याचे घोटाळे होणे हे अत्यंत दुर्दैवी व बांधकाम मजुरांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. त्यामुळे त्वरीत कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे यांनी दिला आहे.
कार्याध्यक्ष बळीराम काकडे, उपाध्यक्ष अनिल गाडे, सरचिटणीस मधुरा डांगे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.