खासगी रुग्णालयाचे ऑडीट करा, महापौरांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी
पिंपरी / महाईन्यूज
खाजगी रुग्णालयात भरमसाठ बिले आकारणी केली, त्यामुळे सामान्य नागरीक, हातावरचे पोट असणारे नागरीक हवालदिल झाले आहेत. याबाबत खाजगी रुग्णालयांचे ऑडीट झाले पाहिजे जेणेकरुन रुग्णालयांच्या दरांमध्ये सुसुत्रता येईल आणि नागरीकांना दिलासा मिळेल अशी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विनंती केली.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या, यावेळी खासदार, आमदार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, आयुक्त राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या काही खाजगी रुग्णांलयांत दाखल होणा-या रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ बिले भरणेबाबत पाठपुरावा करण्यात येतो याबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रारी येत असतात याबाबत रुग्णांलयांकडून सहकार्याची अपेक्षा आहे असे सांगुन कोरोना तिस-या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने तसेच म्युकरमायकोसिस रोगाबाबतीत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी विनंतीही महापौर माई ढोरे यांनी आरोग्य मंत्र्यांना केली.