दगडाने मारहाण करत मित्राच्या खुनाचा प्रयत्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/264646-stone-pelting.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
रात्रीच्या वेळी घराजवळ फेरफटका मारत असताना एकाचे मित्रासोबत भांडण झाले. त्या रागातून मित्राने लाकडी ओंडक्याने, दगडाने मारून मित्राला गंभीर जखमी केले. मारहाण करणा-या मित्राच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 27) सायंकाळी पावणे सात ते सात वाजताच्या कालावधीत मावळ तालुक्यातील माळवाडी येथे घडली.
दिनेश प्रकाश ढोमणे (वय 35, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गोविंद तिमय्या पवार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद यांच्या 30 वर्षीय पत्नीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद हे रविवारी सायंकाळी घराजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी त्यांचे त्यांचा मित्र आरोपी दिनेश याच्यासोबत भांडण झाले. त्यातून आरोपीने लाकडी ओंडक्याने गोविंद यांना मारहाण केली. फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांना आरोपीने ढकलून दिले. त्यानंतर दगडाने गोविंद यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.