गुन्हेगाराच्या पत्नीसोबत फिरत असल्याने गुन्हेगाराने दिली जेलमधून सुपारी : एकास मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/crime-pcmc-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
बायको तिच्या मानलेल्या भावासोबत फिरते म्हणून त्या मानलेल्या भावाला मारण्यासाठी महिलेच्या पतीने जेलमधून एका नुकताच बाहेर आलेल्या आरोपीला सुपारी दिली. त्यानुसार जेलमधून आलेल्या आरोपीने महिलेच्या मानलेल्या भावाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी चार वाजता गावजत्रा मैदान भोसरी येथे घडली.
अमित बाळासाहेब भालेराव (वय 34, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश पाटील आणि त्याच्या सोबतच्या इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (वय 31, रा. दिघी रोड, भोसरी) याच्याशी फिर्यादी यांची लहानपणापासून ओळख आहे गुरुदत्त आणि फिर्यादी यांचा मोठा भाऊ हे वर्गमित्र आहेत. गुरुदत्तच्या पत्नीला फिर्यादी यांनी बहिण मानले आहे. गुरुदत्त हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याला सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी भोसरी पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तेंव्हापासून तो जेलमध्ये आहे.
आरोपी रुपेश पाटील हा पूर्वी भोसरी येथे राहत होता. मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी रुपेश याला अनेक गुन्ह्यांमध्ये अटक केली. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. मागील एक आठवड्या पूर्वी तो जेलमधून सुटून आला आहे.
बुधवारी दुपारी फिर्यादी हे गावजत्रा मैदान भोसरी येथे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी रुपेश तिथे आला. ‘मला बाबा पांडे याने तू त्याच्या बायको बरोबर फिरतो म्हणून तुला मारायला सांगितले आहे’ असे म्हणून रुपेश आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दगडाने मारून मुक्कामार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.