पिंपळे सौदागरला नवीन पोस्ट ऑफिसची मंजुरी
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्याला यश

नागरिकांना पोस्टल सेवांचा मिळणार अधिक जलद लाभ
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले आहे. शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागर परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याच्या मागणीला अखेर मान्यता मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांसमवेत मंजूर करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिसच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरातील नागरिकांना दर्जेदार पोस्टल सेवा मिळाव्यात यासाठी २०२३ पासून या पोस्ट ऑफिससाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या प्रयत्नांना आता यश मिळाले असून पिंपळे सौदागरमध्ये स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा : पिंपळे सौदागरमध्ये फुटपाथ-सायकल ट्रॅकवरील दुचाकींना ‘ब्रेक’
पाहणीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्लायडिंग विंडो व दरवाजे बसवणे, बाथरूमची व्यवस्था करणे, रंगरंगोटी करणे तसेच वॉटरप्रूफिंगची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. नागरिकांना लवकरात लवकर सेवा सुरू व्हावी यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच पिंपळे सौदागर परिसराला स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे या भागाला नवीन पिनकोड 411083 मिळाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पोस्टल सेवांचा अधिक सुलभ आणि जलद लाभ मिळणार आहे.
“पिंपळे सौदागर परिसर झपाट्याने विकसित होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना पोस्टल सेवांसाठी इतर भागात जावे लागत होते. त्यामुळे येथे स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू व्हावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. आता या मागणीला मान्यता मिळाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आवश्यक सुविधा पूर्ण करून हे पोस्ट ऑफिस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय ठेवून पुढील कामेही वेगाने पूर्ण केली जातील.”
– शत्रुघ्न काटे, नगरसेवक तथा शहराध्यक्ष, भाजपा.





