पिंपळे सौदागरमध्ये फुटपाथ-सायकल ट्रॅकवरील दुचाकींना ‘ब्रेक’
वाहतूक सक्षमीकरण : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने कारवाई

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपळे सौदागर (प्रभाग क्र. २८) परिसरातील कोकणे चौक ते स्वराज चौक या बीआरटी मार्गावर फुटपाथ व सायकल ट्रॅकवरून सुरू असलेली दुचाकींची वाहतूक रोखण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पुढाकार घेत ठोस पाऊल उचलले आहे. त्यांच्या सूचनेनुसार बीआरटीएस विभागाला या मार्गावर बोलार्ड्स बसविण्याचे आदेश देण्यात आले असून त्यामुळे पादचारी व सायकलस्वारांना सुरक्षित आणि मोकळा मार्ग उपलब्ध होणार आहे.
कोकणे चौक ते स्वराज चौक या बीआरटी मार्गावर काही वाहनचालकांकडून फुटपाथ आणि सायकल ट्रॅकचा गैरवापर करून दुचाकी चालवली जात असल्यामुळे पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सायकलस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी तातडीने बीआरटीएस विभागाशी संपर्क साधून फुटपाथच्या सुरुवातीला आणि शेवटी बोलार्ड्स बसविण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान
नगरसेविका अनिताताई काटे आणि नगरसेविका कुंदाताई भिसे यांनीही या निर्णयाला पाठिंबा देत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. या उपाययोजनेमुळे आता दुचाकी वाहनांना फुटपाथ व सायकल ट्रॅकवरून ये-जा करणे शक्य होणार नाही. परिणामी पादचारी नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी मोकळा मार्ग मिळेल, तसेच सायकलस्वारांसाठी तयार करण्यात आलेला सायकल ट्रॅकही सुरक्षित राहणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे.
याबाबत बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, “फुटपाथ आणि सायकल ट्रॅक हे पादचारी आणि सायकलस्वारांसाठी असतात. काही वाहनचालकांकडून त्याचा गैरवापर होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे बीआरटीएस विभागाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ पायवाट मिळणे ही आमची प्राथमिकता आहे.”
पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांची सुरक्षितता आणि सोय ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. फुटपाथ आणि सायकल ट्रॅक हे पादचारी व सायकलस्वारांसाठीच असतात; त्यांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ देणार नाही. त्यामुळे कोकणे चौक ते स्वराज चौक या बीआरटी मार्गावर दुचाकींची वाहतूक रोखण्यासाठी तातडीने बोलार्ड्स बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढेही नागरिकांना सुरक्षित, सुसज्ज आणि शिस्तबद्ध वाहतुकीची व्यवस्था मिळावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.





