विद्युतदाहिनीसह वायू प्रदूषण यंत्रणा बसविण्यास मान्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/BJP-government-84-780x470.jpg)
पिंपरी : चऱ्होली येथील स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी बसविणे तसेच बोपखेल आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या विषयासह विकास कामांच्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत स्थायी समिती सभा पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रवीण जैन यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच झाडे वाचवण्यासाठी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी विद्युतदाहिनीचा वापर करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यानुषंगाने चऱ्होली येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात येणार असून त्यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समिती सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
बोपखेल येथील स्मशानभूमीत आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील स्मशानभूमीत पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना धुराचा त्रास होऊ नये यासाठी पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.