ऐन गणेशोत्सवात नागरिकांना फटका; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये CNG च्या दरात मोठी वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-86-780x470.jpg)
पिंपरी : ऐन गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा फटका बसला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) किंमतीत ९० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी पुण्यात आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलोसाठी ८५ रुपये द्यावे लागत होते.
आता नागरिकांना सीएनजी प्रतिकिलोसाठी ८५.९० रुपये मोजावे लागणार आहेत. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. असं असलं तर पीएनजी दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या शहरांना सीएनजी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) आंतरराष्ट्रीय नैसर्गिक वायू बाजारपेठेत वाढत्या किमतीमुळे दरवाढीची घोषणा केली. ही वाढ नाममात्र असली तरी सीएनजीची वाढती मागणी आणि आयात खर्च यामुळे ही वाढ झाली आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन
सीएनजीच्या किंमतीत वाढ केल्यानंतर एमएनजीएलने म्हटलं आहे की, आजही पारंपारिक इंधनाला कमी खर्चिक पर्याय हा सीएनजीच आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीमुळे ४९ टक्के बचत होते. तर डिझेलपेक्षा सीएनजी २७ टक्के स्वस्त आहे. पेट्रोल किंवा डिझेलऐवजी सीएनजी वापरताना रिक्षाचालकांना २९ टक्के बचतीचा फायदाही होतो.
दरम्यान, याआधी जुलैमध्येही सीएनजीच्या किमतीत १.५० रुपये प्रतिकिलोने वाढ झाली होती. यानंतर सीएनजीची किंमत ८५ रुपये प्रतिकिलो झाली होती. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून या पर्यावरणपूरक इंधनाकडे वळलेल्या वाहनचालकांची चिंता वाढली आहे.