‘संतपीठा’तील प्रवेश प्रक्रियेला १४ जुलैपासून प्रारंभ; शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लॉटरी पध्दतीने होणार!
![Admission process for Santpeetha starts from July 14; The educational admission process will be done by lottery system!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/DSC8754.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चिखलीत उभारण्यात येत असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठातील प्रवेश प्रक्रियेला येत्या १४ जुलै रोजी प्रारंभ होणार आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्गात प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक मॉडेलचा शुभारंभ २३ जुलै रोजी होणार आहे.
‘कोविड-19’ या विषाणूच्या संसर्गापायी सर्व वर्ग ऑनलाइन माध्यमातून सुरू होतील. पूर्व प्राथमिक वर्गासाठी वार्षिक शिक्षण शुल्क प्रती विद्यार्थी १५ हजार रुपये असेल. मात्र शैक्षणिक साहित्याचा खर्च वेगळा असेल, असे शैक्षणिक संचालक स्वाती मुळे यांनी सांगितले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या उद्घाटनाबाबत चर्चा करण्यासाठी आज (बुधवारी) आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत संतपीठाच्या संचालक मंडळासमवेत बैठक झाली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त तथा संतपीठाचे अध्यक्ष राजेश पाटील, फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी तथा सचिव ज्योत्स्ना शिंदे, संचालक प्रा. डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प. राजू महाराज ढोरे, शैक्षणिक संचालक स्वाती मुळे, सल्लागार प्रा. अभय टिळक, महापालिका मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे आदी उपस्थित होते. संतपीठाच्या दुस-या टप्प्यातील इमारतीचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले.
संतपीठाच्या इमारतीच्या रचनेमध्ये संतांच्या विचारांचे प्रतिबिंब असावे तसेच परिसरात वृक्षारोपण करावे असे महापालिका आयुक्त तथा संतपीठाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले. संत विचारांमधून प्रसृत होणा-या उच्च अशा मानवी मुल्यांचे सिंचन संस्कारक्षम वयापासून होणे गरजेचे असल्यामुळे इंग्रजी माध्यमातून दिल्या जाणा-या औपचारिक शिक्षणाला मूल्यशिक्षणाची जोड देण्यासाठी संतपीठ प्रभावी माध्यम ठरेल असे आमदार महेश लांडगे म्हणाले.
प्रा. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, आधुनिकता आणि परंपरा यांचे संतुलन जीवनामध्ये साकारणारी निरामय शिक्षणपद्धती विकसित करण्याचा एक अनोखा उपक्रम जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठाच्या माध्यमातून टाळगाव-चिखली येथे साकारतो आहे. प्रचलीत औपचारिक शालेय शिक्षणाला पूरक अशा अध्ययन-अध्यापन प्रणालीचा अंतर्भाव असणा-या या शैक्षणिक प्रयोगाचा पहिला टप्पा जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्वरूपात सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षात प्रवर्तित केला जाणार आहे.